तरुणाच्या अंत्यविधीस नातेवाईकांचा नकार; ट्रॅक्टरच्या धडकेत झाला होता मृत्यू

शेख मुनाफ
Monday, 4 January 2021

अपघात होऊन एक दिवस झाला तरी पाचोड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला नव्हता

आडुळ (जि.औरंगाबाद): रविवारी ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी स्वार बाबासाहेब संजय ढोकळे हा नवविवाहित तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. आज सोमवारी (ता.4) रोजी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह आडुळ बु. (ता.पैठण) येथे आणण्यात आला.

मात्र अपघात होऊन एक दिवस झाला तरी पाचोड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला नव्हता. तसेच ट्रॅक्टर चालक व मालकाला अटक किंवा त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी सोमवारी दुपारी जो पर्यंत ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही, तो पर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही असा पवित्रा घेतल्याने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.

औरंगाबादच्या नामांतरावर अजित पवार बोलले...

मात्र नंतर तत्काळ पाचोड पोलिस ठाण्याचे रविंद्र क्षिरसागर, विश्वजित धन्वे, चालक जीवन गाढेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन संबधित फरारी ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन देऊन जमावाला शांत केले. पोलिसांनी शंभर टक्के अपघातास कारणीभूत ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात येईल असे सांगितल्याने नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. यानंतर बाबासाहेब ढोकळे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'

अपघात होताच ट्रॅक्टर चालक दुचाकीस्वारास किती मार लागला तो जिवंत आहे का त्याचा मृत्यू झाला काहीही न बघता घटनास्थळावरून ट्रॅक्टर सह फरार झाला होता. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी अंत्यविधीस नकार दिला होता असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad accident news Relatives refuse for the funeral