शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'

 दत्ता देशमुख
Monday, 4 January 2021

राजकारणात धक्कादायक निकाल घडवून आणण्यात शरद पवार यांचा हातखंडा आहे

बीड: जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासाच्या पानावर क्षीरसागर काका - पुतण्यांतला वाद लिहून झाला आहे. भविष्यात एकोपा अशक्यच आहे. मात्र, काका - पुतण्यांना श्रेष्ठींकडून कसे बळ मिळते यावर पुढची वाटचाल महत्त्वाची आहे. पुतणे संदीप क्षीरसागर यांना राजकारणातले दिग्गज काका खासदार शरद पवारांनी लिफ्ट केले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काका जयदत्त क्षीरसागर यांना मात्र म्हणावे तेवढे बळ मिळले नाही.

राजकारणात धक्कादायक निकाल घडवून आणण्यात शरद पवार यांचा हातखंडा आहे. त्याची प्रचिती म्हणजे जिल्ह्यात दिवंगत नेते सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री असताना गोविंदराव डकांकडून त्यांचा पराभव घडविला होता. दरम्यान, जिल्ह्यात मुंडें व नंतर क्षीरसागर या दोन मातब्बर राजकारण्यांच्या घरात ‘काका - पुतणे’ अंक घडले. पण, धनंजय मुंडे यांच्या बंडात आणि अलीकडे संदीप क्षीरसागर यांच्या बंडात सुरुवातीला शरद पवार यांची भूमिका न्यूट्रलच होती.

दीड लाख लोकांच्या टेस्ट, लातूर जिल्ह्यात दहा महिन्यांत कोरोनाचे २३ हजार रुग्ण

पण, सुरुवातीला संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी आणि जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर विरोधकांनी बळ दिल्याने खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनीच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले. महायुती सरकारच्या काळात त्यांना उद्धव ठाकरे यांनी अल्पकाळासाठी कॅबीनेट मंत्रीपदाचाही मान दिला. मात्र, त्यानंतर शरद पवारांनी आपल्या हाताची ताकद संदीप क्षीरसागर यांच्या पाठीमागे लावली आणि मातब्बर जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला.

दरम्यान, अजित पवार यांच्या कथित बंडाच्या वेळी संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या तंबूत उडी घेत समर्थन दिले. संदीप क्षीरसागरांचा हा निर्णय अजित पवार गटासाठी अनपेक्षित असल्याने सुरुवातीला त्यांना त्रासही सहन करावा लागला. पण आता त्यांचा निर्णय आता त्यांच्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याचे दिसत आहे. कारण, मागच्या काही काळांपासून शरद पवार व सुप्रिया सुळे यांची संदीप क्षीरसागर यांच्यावर विशेष मेहरबानी दिसत आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी संदीप क्षीरसागरांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घडवून दिली. शिवाय दिल्लीहून मुंबईला स्वत:च्या विमानात सोबत आणले.

लग्नाची हळद फिटण्यापूर्वीच एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला, ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

एकीकडे क्षीरसागर पुतण्याला मातब्बर काका ‘लिफ्ट’ करत असताना दुसरीकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सत्तेच्या माध्यमातून वर्षभरात तरी भरीव लिफ्ट मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या कालावधीत जयदत्त क्षीरसागर लिफ्ट होतील असा एखादे मोठे काम, त्यांच्यासोबत कार्यक्रम फारसे दिसलेले नाहीत. शरद पवारांची उद्धव ठाकरेंवरील ‘मर्जी’ आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावरील ‘खप्पा मर्जी’ हे यामागचे इंगित आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने जिल्ह्यात असे चित्र अपेक्षित होते. पण, जिल्ह्यात सत्तेच्या चाव्या हाती असलेल्या राष्ट्रवादीकडून क्षीरसागरांच्या ताटात फार काही पडल्याचे दिसत नाही. तशी, अद्याप जयदत्त क्षीरसागर यांनी अस्वस्थता उघड होऊ दिली नसली तरी भविष्यातील नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत तग धरण्यासाठी पक्षाने फारसे बळ दिले नाही. जिल्ह्यातील शिवसेनेचीही यापेक्षा वेगळी गत नाही. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतील जयदत्त क्षीरसागर सध्यातरी लिफ्टविनाच असून असेच सुरु राहीले तर जिल्ह्यातील शिवसेना तरी डरकाळी कशी फोडणार असा प्रश्न आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP sharad pawar sandip kshirsagar beed politics