esakal | रस्त्यांसाठी पैसे देऊ पण शहर ठेवा स्वच्छ : आदित्य ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad news

शासनातर्फे शक्‍य तेवढा निधी दिला जाईल; मात्र रस्त्यांची कामे अर्धवट न सोडता पूर्ण करा. फुटपाथ करताना गट्टू बसविल्यानंतर विविध कामांसाठी ते उखडले जातात. त्यामुळे इमॉस कॉंक्रिटीकरणचा वापर करा, दुभाजकांची कामे करा, फुटपाथवर झाडे लावण्यासाठी कुंड्यांचा वापर करा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला.

रस्त्यांसाठी पैसे देऊ पण शहर ठेवा स्वच्छ : आदित्य ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद-शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेने 462 कोटी रुपयांची शासनाकडे मागणी केली असली, तरी शक्‍य होईल तेवढा निधी देऊ; पण रस्त्यांची कामे पूर्ण करा. प्लॅस्टीक बंदीचा कारवाई तिव्र करा, इलेक्‍ट्रीक शहर बससाठी प्रस्ताव द्या, असा सल्ला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 13) महापालिकेला दिला. 

शहरातील पर्यटनसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट बस, सफारी पार्कच्या कामांचे सादरीकरण केले. 113 रस्त्यांचा 462 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यात फुटपाथ, साईडड्रेनसह आवश्‍यक कामांचा समावेश करण्यात आला असल्याचे आयुक्तांनी सादरीकरणाद्वारे ठाकरे यांना सांगितले.

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी

सातारा-देवळाई व शहरासाठी वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्यात आले असले तरी शासनातर्फे शक्‍य तेवढा निधी दिला जाईल; मात्र रस्त्यांची कामे अर्धवट न सोडता पूर्ण करा. फुटपाथ करताना गट्टू बसविल्यानंतर विविध कामांसाठी ते उखडले जातात. त्यामुळे इमॉस कॉंक्रिटीकरणचा वापर करा, दुभाजकांची कामे करा, फुटपाथवर झाडे लावण्यासाठी कुंड्यांचा वापर करा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. बैठकीस उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलिल, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 
 
सफारी पार्कसाठी मुंबईत बैठक 
सफारी पार्कसंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेण्याचे आश्‍वासन श्री. ठाकरे यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान आवास योजनेसाठी येत्या आठ दिवसांत तीसगाव येथील जागा महापालिकेला देण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. संत एकनाथ रंगमंदिराच्या सुशोभीकरणासाठी पैसे देऊ, सलीम अली सरोवर परिसरात स्वच्छता ठेवा, अशा सूचना त्यांनी महापालिकेला केल्या. 
 
रस्ते, दुभाजकातील कचरा कमी करा 
शहरातील कचरा कमी करण्यासाठी "कचरा फेकणार नाही, कचरा फेकू देणार नाही' अभियान राबवा. 100 किलोपेक्षा जास्त कचरा तयार करणाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करा. नाले दुभाजकातील कचरा स्वच्छ करा, अशा सूचना श्री. ठाकरे यांनी केल्या. आयुक्तांच्या प्लॅस्टिकबंदीच्या कारवायांचे त्यांनी कौतुक केले. महेमूद, मकाई गेट, बारापुल्ला दरवाजांच्या पुलांची कामे झाल्यानंतर त्यावर सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या. 
 
उंची वाढविल्यास, शिवरायांचा पुतळा दिसणार का? 
ेक्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेतर्फे करण्यात आली. यावेळी श्री. ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही; मात्र उंची वाढविल्यानंतर महाराजांचा पुतळा दिसणार का? असा प्रश्‍न केला व चांगले डिझाईन तयार करा, अशा सूचना त्यांनी केल्या. 

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा  

मिनी बस सुरू करा, इलेक्‍ट्रिकसाठी प्रस्ताव द्या 
मिनी शहर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार महापालिकेनेदेखील प्रयत्न करावेत. इलेक्‍ट्रिक बससाठी अर्ज करा, सध्या सुरू असलेल्या बस स्वच्छ ठेवा, अशा सूचनाही ठाकरे यांनी केली. 
 
पाणीपुरवठा योजनेसाठी लागणार चार वर्षे 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करण्यात आले. योजना पूर्णत्वास येण्यासाठी चार वर्षे लागतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चार निविदांपैकी दोन निविदा पात्र ठरल्या असून, त्यांचे फायनान्शियल बिड उघडण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.