शेतकऱ्यांसाठी खुशखबर! बांधावरच मिळणार खत, योजनेला प्रारंभ

दुर्गादास रणनवरे
शनिवार, 23 मे 2020

रोहयो मंत्री भुमरे यांच्या हस्ते फीत कापून मोहिमेला सुरवात

औरंगाबाद : तालुक्यातील कचनेर व पिंप्री राजा येथे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते बांधावर खत वाटप योजनेला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापती छाया घागरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदवले जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, प्रकाश चांगुलपाये, पंचायत समिती सदस्य रामकिसन भोसले, औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव पाटील शेळके, गटविकास अधिकारी श्री. राठोड कृषी अधिकारी गंजेवार, पिंपरी राजा सोसायटीचे चेअरमन संदीपान नाना पवार, मुरलीधर आन्ना चौधरी, प्रकाश पवार, बंडू घोरपडे, प्रकाश जाधव, बालाजी हूलसार, शेतकरी उपस्थित होते. तसेच पिंपरी राजा येथे श्री. भुमरे व जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेतले. अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

कामांना वेग
कोरोनाचा कहर वाढल्यामुळे सध्या कोणतीही गोष्ट सुरक्षित अंतराशिवाय  करू नये असे शासनाचे आदेश आहेत. अशातच मध्यंतरी शासनाने कडक लॉकडाऊन जारी केले होते. त्यामुळे शेतीचीही कामे ठप्पच होती. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या करता येणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर शासनाने शेतीकामांना त्यातून सूट दिली. त्यानंतरही शेती अवजारे, खते, बियाणांची दुकाने बंद राहिली. ही दुकाने उघडण्याची शासनाने परवानगी दिली. त्यानंतर शेतीतील कामे पुन्हा वेगाने सुरू झाली. 

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत मेच्या  अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या
 

गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली. आता मोठा पाऊस झाला की काही दिवसांत शेतकरी पेरणी सुरू करतील. त्यादरम्यान त्यांना लागणाऱ्या खतांविषयी कृषी विभागाने आत्तापासूनच काळजी घेतली आहे. पेरणी दरम्यान अचानक खतांची मागणी वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांना आत्तापासून खते घेण्याचे कृषी सहाय्यकांमार्फत आवाहन केले आहे. त्याची दखल घेत शेतकरीही आता खते खरेदी करून ठेऊ लागले आहेत. मात्र, हे करताना कृषी सेवा केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेतली आहे. त्याअंतर्गत शेतकरी बचत गटांमार्फत थेट गावात, बांधावर बळीराजाला खते पोच करण्याची कार्यवाही कृषी विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Agricultural News