पेट्रोल, गॅस दरवाढविरोधातील घोषणांनी दणाणला क्रांती चौक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

जर ही दरवाढ रद्द केली नाही तर शिवसेना ही लढाई आणखी तीव्र करेल असा इशारा दिला.

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेलच्या दरात करण्यात आलेली वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधातील घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणून गेला. पेट्रोल डिझेल इतके महाग झाले आहे की बैलगाडीनेच प्रवास करण्याची लोकांवर वेळ आली आहे तर स्वयंपाकाच्या गॅसमुळे चुलीवर भाकरी करण्याची वेळ आल्याचे दर्शवत आंदोलनादरम्यान बैलगाडीने प्रदक्षिणा करून व चुलीवर स्वयंपाक करण्यात आला.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ केली आहे तर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरची सबसिडी बंद करून सिलेंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर या तिन्ही गोष्टी गेल्या आहेत. ही दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (ता. पाच) क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

सरपंच व्हायचंय.....तर मग कोरोना चाचणी केलीच पाहीजे!

गॅस सिलिंडर महागल्याने आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ या सरकारने आणल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने दगडांच्या चुली मांडून त्यावर भाकऱ्या थापून महागाईचा निषेध केला तर पेट्रोल, डिझेल महागल्याने लोकांना आता बैलगाडीने प्रवास करण्याची परिस्थिती आणल्याचे आंदोलनादरम्यान बैलगाडीने क्रांतीचौकात प्रदक्षिणा घालून आंदोलकांनी दाखवले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा औरंगाबाद दौरा आटोपता; जाणून घ्या काय झालं या दौऱ्यात

यावेळी केंद्र सरकार हाय हाय, जय भवानी जय शिवाजी, महागाईवर हल्ला बोल...पेट्रोल दरवाढीवर हल्लाबोल...डिझेल दरवाढीवर हल्लाबोल...गॅस सिलेंडर दरवाढीवर हल्लाबोल.. शिवसेनेचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी हाय हाय अशा घोषणा देत क्रांती चौक परिसर दणाणून सोडला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या, उज्वला सारखी फसवी योजना आणली. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने लोकांना आता चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करण्यात यावी. शिवसेनेचा जन्म आंदोलनासाठीच झालेला आहे. जर ही दरवाढ रद्द केली नाही तर शिवसेना ही लढाई आणखी तीव्र करेल असा इशारा दिला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news ghoshna against petrol and gas price hike Kranti Chowk