औरंगाबादमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सुषेन जाधव
Friday, 12 February 2021

पथकांनी स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी लागणारे २२ हजारांचे साहित्य जप्‍त केले. 

औरंगाबाद: बनावट मतदान कार्ड (निवडणूक ओळखपत्र) तयार करणाऱ्‍या दोघांना पुंडलिकनर पोलीस आणि निवडणूक विभागाच्या पथकाने संयुक्‍तरित्या कारवाई करत अटक केली. हरीष घुराजी वाघमारे (२२, रा. गजानन कॉलनी) आणि नवनाथ मक्‍तदास शिंदे (२६, रा. हनुमाननगर ग. नं ३) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडून २२ हजारांचे ईलेक्ट्रॉनीक साहित्य जप्‍त करण्यात आले आहे.

या प्रकरणात निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रेवनाथ ताठे (४८, रा. राजे संभाजी कॉलनी, जाधववाडी) यांच्या फिर्यादीनुसार ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने बनावट ग्राहक बनून आरोपी हरीष वाघमारे याच्या गजानन कॉलनी येथील मातोश्री डिजीटल सेवा या दुकानातून बनवाट मतदान कार्ड तयार करुन घेतले होते. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी तहसीलदार शंकर लाड यांनी नायब तहसीलदार रेवनाथ ताठे यांना पत्र देवून बनवाट मतदान कार्ड तयार करुन ते वाटप करणाऱ्‍या व्यक्‍तीवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यास सांगितले.

अखेर ते १७ बैल मुळ मालकास देण्याचे औंढा न्यायालयाचे आदेश

त्यानूसार निवडणूक विभागाचे पथक व पुंडलिकनगर पोलिसांचे पथकाने छापा मारुन हरीश वाघमारे आणि नवनाथ शिंदे या दोघांना अटक करुन २२ हजारांचे ईलेक्ट्रॉनिक साहित्य जप्‍त केले. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, संशयितांना शुक्रवारपर्यंत (ता.१२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी सुनावली. प्रकरणात सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. 

शासनाचा मोठा निर्णय! आता सरपंचांच्या प्रशासकीय अडचणी होणार दूर... 

महाईसेवा केंद्रातून होते प्रिंट 
बनावट ओळखपत्र तयार केल्यानंतर आरोपी वाघमारे याने त्याची प्रिंट काढण्यासाठी ते ओळखपत्र ईमेलव्दारे हनुमान चौकातील विलास प्रकाश कांबळे (रा. ग.नं. ३, हनुमाननगर, गारखेडा) याच्या मालकिच्या सुपर फास्ट महाईसेवा केंद्रात पाठविले. या केंद्रात काम करणारा नवनाथ शिंदे याने त्या ओळखपत्राची स्मार्ट प्रिंट काढून दिली. त्यानंतर पथकांनी स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी लागणारे २२ हजारांचे साहित्य जप्‍त केले. 

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news in marathi Fake election identity card gang busted