सोमवारपासून औरंगाबाद शहरात दहा दिवस कडक लॉकडाऊन?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 6 March 2021

सात दिवस तीनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले किंवा महापालिकेचे कोविड केअर सेंटर फुल्ल झाले तर नाविलाजाने लॉकडाऊन लागू केले जाईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केले होते

औरंगाबाद: शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज तीनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण निघत असल्याने महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर व खासगी रुग्णालये फुल्ल झाले आहेत. त्यामुळे सोमवारपासून (ता. आठ) दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तीनशेपेक्षा अधिक बाधित रुग्ण निघत आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरात दहा दिवसाचा लाँकडाऊन लावण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवारपासून अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला बाधित रुग्ण २९९ इतके होते. दोन मार्चला ३०७, तीनला ३३९, चार तारखेला ३५१, पाच तारखेला ३५३ या प्रमाणे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

धक्कादायक! उस्मानाबाद शहराजवळ बिबट्याचा गूढ मृत्यू; परिसरात खळबळ

सात दिवस तीनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले किंवा महापालिकेचे कोविड केअर सेंटर फुल्ल झाले तर नाविलाजाने लॉकडाऊन लागू केले जाईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केले होते. सध्या कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालये फुल्ल झाले असून, बेडची कमतरता भासत आहे. दिवसेंदिवस पाँझिटिव्हीटी रेट वाढत जात असल्यामुळे प्रशासनाने लाँकडाऊन लावण्याची तयारी सुरू केली सोमवारपासून पुढे दहा दिवस लाँकडाऊन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

रुग्णसंख्या वाढताच आणखी दोन सेंटर सुरू 
फेब्रुवारी महिन्यापूर्वी फक्त मेल्ट्रॉन व पदमपुरा कोविड केअर सेंटर सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसात महापालिकेने आणखी पाच कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. शुक्रवारपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुला-मुलींचे वसतीगृह ताब्यात घेऊन त्या ठिकाणी २३० रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिपेट वसतीगृहात देखील २७० बेडची सुविधा राहणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Corona Updates: औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ; मागील 24 तासांत कोरोना रुग्णांची...

खासगी रुग्णालये फुल्ल 
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालये देखील कोरोना रुग्णांमुळे फुल्ल होत आहेत. सध्या शहरात २,३८५ रुग्ण उपचारासाठी दाखल झालेले आहेत. त्यापैकी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १०३० रुग्ण असून, खासगी रुग्णालयात १३५५ जण दाखल झाले आहेत. 

पॉझिटिव्हीटी रेट गेला तब्बल १३ टक्क्यांवर 
शहरात दररोज दोन हजार चाचण्या केल्या जात असून, त्यातून तीनशेपेक्षा अधिक नागरिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट हा १३ टक्क्यांपेक्षा पुढे गेला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाला उपाययोजना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकाच कुटुंबातील सदस्य बाधित होत असून, अशा कुटुंबाची संख्या देखील ३०० एवढी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news Ten days of strict lockdown in Aurangabad Monday