'वडेट्टीवार राजीनामा द्या, महाराष्ट्राची माफी मागा'

vijay vadettiwar
vijay vadettiwar

औरंगाबाद: 'जालना येथील एका मोर्चामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ मंत्री वडेट्टीवार यांचा राजीनामा द्यावा त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी' अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी (ता.२८) करण्यात आली. त्या वक्तव्‍याविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या विषयाचे विभागीय आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे हस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील, समन्वयक किशोर चव्हाण, सुरेश वाकडे पाटील, मनोज गायके, सतीश  वेताळ, विजय काकडे, सुकन्या भोसले, रेखा वहाटूळे, प्रदीप हरदे, दिव्या मराठे, शिवाजी जगताप, योगेश औताडे, अंकुश चव्हाण, सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण  करण्यात आले. 

श्री.दाते म्हणाले की, रीतसर आणि कायद्यात राहून राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाच्या न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड आयोग नेमला होता. मंत्री वडेट्टीवार यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे असून त्यंनी संविधानाचा अवमान केला आहे. यामुळे राज्य मंत्रिमंडळाने वडेट्टीवार यांचा राजीनामा घ्यावा असेही दाते म्हणाले. जालन्यातील मोर्चात सहभागी असलेली वडेट्टीवारसह लोकप्रतिनिधींना मराठा समाजाने निवडून दिले असताना ते सामाजाच्या विरोधात मोर्चे काढत असल्याचा आरोप किशोर चव्हाण यांनी केला आहे.

तर मराठा सामाजाच्या विरोधात जाणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात मराठा समन्वयक आता प्रत्येक घराघरांत जनजागृती करणार आहे. निवडणुकीच्या काळात या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीष वेताळ पाटील यांनी सांगितले. तर हे लक्षणीक उपोषण मंडप टाकून दोन तास उपोषण व त्यानंतर निवेदन दिले जाणार होते. मात्र पोलिसांनी मंडप टाकू दिला नाही. यामुळे विना मंडपच आंदोलन केले. वडेट्टीवार हे मंत्री असल्यामुळे  सर्वांना सोबत घेऊन जाण्याऐवजी दोन समाजात वाद निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप मनोज गायके यांनी केला.

पोलिस आणि समन्वयकांमध्ये बाचाबाची-
लक्षणीक उपोषणासाठी गेलेल्या समन्वयकांना पोलिसांनी अडवले. मंडप टाकले  तर गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी उपोषणकर्त्यांनी केल्यामुळे पोलिस आणि मराठा क्रांती मोर्च्यात बाचाबाची झाली. व मंडप न लावताच क्रांती मोर्चाची समन्वयकांनी मंडप न टाकताच रस्त्यावरच उपोषण केले. दोन ते तीन तास उपोषण करून  विभागीय आयुक्त कार्यालयास निवेदन देण्यात आले.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com