वाहनचालक याच पुलावर लघुशंकेसाठी का थांबतात...

शेखलाल शेख
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

एपीआय कॉर्नरच्या चौकापासून मुकुंदवाडीकडे जाताना खालील पिलरखाली दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. शिवाय काचाही दिसून येतात. पिलरला लागून मोठ्या प्रमाणात घाण दिसते. काही जण येथे वाहने थांबवून लघुशंका करताना दिसतात. रात्रीच्या वेळेस येथे दारूड्यांचा वावर दिसून येतो. 

औरंगाबाद : सिडकोतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल शहरातील सर्वाधिक लांब असलेल्या उड्डाणपुलांपैकी एक आहे. मात्र, सुशोभीकरणाचा भाग वगळता इतर पिलरवर पोस्टर्स, पॉम्प्लेट चिकटवून त्याचे विद्रुपीकरण करण्यात आले, तर बहुतांश पिलरच्या बाजूला अनेकजण लघुशंका करतात. रात्रीच्या वेळी पुलाखाली अंधार असल्याने येथे दारूड्यांचासुद्धा संचार असतो. काही पिलरच्या बाजूला येथे दारूच्या बाटल्या तसेच काचा पडलेल्या आहेत.

हेही वाचा : औरंगाबाद,जालन्यातील तीन अवैध सावकारांवर कारवाई 

पोस्टर्समुळे पिलरचे विद्रुपीकरण 

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिडकोतील उड्डाणपूल बांधण्यात आला. उड्डाणपूल बांधल्यानंतर येथे देखरेख होत नसल्याने उड्डाणपुलाखाली घाण दिसून येते. वसंतराव नाईक महाविद्यालयाकडून येताना येथील पिलरच्या बाजूला कोणतीही जाळी नसल्याने सर्वांचा मुक्त संचार असतो. येथील सर्वच पिलरच्या बाजूला अनेक जण लघुशंका करतात. तसेच सर्वच पिलरवर पोस्टर्स लावून त्याचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. पिलरवर एकानंतर एक पोस्टर लावण्यात आल्याने येथे पोस्टर्सचा थर दिसून येतो. 

लघुशंका आणि घाण 

उड्डाणपुलाचा मध्य भाग सोडून मुकुंदवाडीकडे पुढे गेल्यावर बहुतांश पिलरच्या बाजूचा वापर लघुशंकेसाठी केला जातो. शिवाय येथील पिलवरवर पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. येथे कुणी काय करावे यावर कुणाचे नियंत्रण दिसत नाही. शिवाय येथे भिकारीसुद्धा झोपताना आढळून आले.

क्लिक करा : बलात्काऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप 

दारूड्यांचा वावर

एपीआय कॉर्नरच्या चौकापासून मुकुंदवाडीकडे जाताना खालील पिलरखाली दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. शिवाय काचाही दिसून येतात. पिलरला लागून मोठ्या प्रमाणात घाण दिसते. काही जण येथे वाहने थांबवून लघुशंका करताना दिसतात. रात्रीच्या वेळेस येथे दारूड्यांचा वावर दिसून येतो. 

अर्धे पथदिवे बंद

सिडकोच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील अर्ध्यापेक्षा जास्त पथदिवे बंद आहेत. कुठे चालू तर कुठे बंद अशी स्थिती दिसते. मुकुंदवाडीकडील भागाकडील पथदिवे तर बंद दिसतात. शिवाय एक पथदिवा चालू तर दोन बंद अशी स्थिती आहे. शिवाय उड्डाणपुलाच्या खाली तर अंधारच असतो.

हेही वाचा : येळकोट : लैंगिकतेची "बोल्ड' चर्चा 

मध्यभागी सुशोभीकरण 

उड्डाणपुलाच्या मध्यभागी एका शाळेकडून चार पिलरचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावर सुंदर पेटिंग करण्यात आली आहे. सोबत चौकांभोवती जाळी लावण्यात आली. मात्र या जाळीतसुद्धा काही जणांनी कचरा तसेच प्लॅस्टिक टाकलेले दिसते. या जाळीच्या बाजूला अनेक जण बसलेले दिसतात. मात्र मधोमध सुशोभीकरण झाल्याने मधील पिलर सुंदर दिसतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad CIDCO Flyover News