
औरंगाबाद शहरातील ३९ हजार ४० नागरिक रक्तदाब, मधुमेह, किडनीसारख्या आजाराने त्रस्त असल्याचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.
औरंगाबाद : शहरातील ३९ हजार ४० नागरिक रक्तदाब, मधुमेह, किडनीसारख्या आजाराने त्रस्त असल्याचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील १२ लाख ७१ हजार ४४० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सोमवारी (ता. नऊ) सांगितले. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राज्यभर ‘माझे कुटुंब, माझे जबाबदारी’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने महापालिकेने शहरात विविध पथकांमार्फत सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेतली होती. यासंदर्भात श्रीमती पाडळकर यांनी सांगितले की, मोहिमेच्या दुसऱ्या टप्यात महापालिकेच्या ३७ आरोग्य केंद्राच्या २४१ पथकांनी १९ ऑक्टोबरपासून सर्व्हेक्षणास सुरुवात केली. १३ लाख ६२ हजार ६३१ नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सहा नोव्हेंबरपर्यंत १२ लाख ७१ हजार ४४० नागरिकांची म्हणजेच ९३ टक्के जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ३९ हजार ४० जणांना रक्तदाब, मधुमेह, किडणीचे आजार असल्याचे आढळून आले. या रुग्णांचे मोबाईल नंबर पथकातील कर्मचाऱ्यांनी घेतले असून, त्यांच्या प्रकृतीवर कोविड नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
२७९ जण पॉझिटिव्ह
सर्व्हेक्षणात ७३ रुग्ण सारीचे तर व्हायरलचे आजार असलेले १४३१ जण आढळून आले. संशयित रुग्ण म्हणून १२१७ जणांना कोरोना चाचणीसाठी विविध आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले त्यातून २७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
Edited - Ganesh Pitekar