esakal | औरंगाबादेत थरार! तरुणावर प्राणघातक हल्ला करुन हल्लेखोर चाकू घेऊन फिल्मी स्टाईलने लागले पाठीमागे
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

महत्वाची बाब म्हणजे प्राणघातक हल्ल्याचे एका दुकानातील सीसीटीव्हीत आलेले फुटेज हल्लेखोराने ‘डिव्हीआर’ला सॉफ्टवेअर मारुन नष्ट केले.

औरंगाबादेत थरार! तरुणावर प्राणघातक हल्ला करुन हल्लेखोर चाकू घेऊन फिल्मी स्टाईलने लागले पाठीमागे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जागेच्या ताब्यासाठी लोखंडी दरवाजा ठोकून संसारोपयोगी वस्तू टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखल्याने तरुणावर चाकुहल्ला झाला. त्यानंतर हल्लेखोर चाकू घेऊन फिल्मी स्टाईलने पाठीमागे लागल्याने काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही गंभीर घटना शनिवारी (ता. १३) दुपारी गारखेड्यातील विजयनगर येथे घडली. महत्वाची बाब म्हणजे प्राणघातक हल्ल्याचे एका दुकानातील सीसीटीव्हीत आलेले फुटेज हल्लेखोराने ‘डिव्हीआर’ला सॉफ्टवेअर मारुन नष्ट केले.


पोलिसाकंडून प्राप्त माहितीनुसार, राहुल गंगाधर नरवडे (वय ३३, रा. सातारा परिसर), एकबाल शेख दादा शेख (वय ३२), हूसेन शेख दादा शेख (वय ४०, दोघे रा. गारखेडा गाव) अशी संशयितांची नावे आहेत.विजयनगर भागात दीड महिन्यांपूर्वी भास्कर सखाराम मोरे (रा. बाळकृष्णनगर, गारखेडा परिसर) यांनी विजयनगर ते कालीका माता मंदीर रोडवरील दुकान खरेदी केले. तेथील जुने बांधकाम पाडून त्यांनी नवीन बांधकाम सुरु केले.

शनिवारी दुपारी एकच्या सुमारास भास्कर मोरे यांचे सख्खे भाऊ राजाराम मोरे यांना बांधकामावरील गवंड्याने काही जण बाऊंसर, महिलांना घेऊन तेथे आले व लोक बांधकामावर लोखंडी गेट ठोकत असल्याचे सांगितले. त्यानंतर ऋषीकेश मोरे (वय २३) व त्यांचे नातेवाईक बांधकामाच्या ठिकाणी पोचले. मोरे यांनी त्यांना विचारणा केली, तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ व धमक्या देण्यास सुरुवात केली. यातून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर राहुल नरवडे याने महेश मोरे यांच्या छातीवर चाकुने वार केला. पण हा वार थोडक्यात महेशने हुकवला व तो महेशच्या डाव्या बोटाच्या अंगठ्याजवळ लागला.


हल्ल्यामुळे महेश कालीका माता मंदिराच्या दिशेने पळाले. नरवडे ऋषीकेश यांच्याजवळ गेला व त्याने मागून ऋषीकेशच्या बरगडीखाली चाकुने वार केला. यात ऋषीकेश गंभार जखमी झाले. त्याच्या मदतीसाठी ऋषीकेश यांचे चुलत भाऊ विनय मोरे यांनी धाव घेतली असता नरवडे त्यांच्या मागे धावू लागला पण नागरिक जमा होत असल्याचे पाहून नरवडेने दोन साथीदारांसह दुचाकीवरुन पोबारा केला. गंभीर जखमी ऋषीकेश यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर लगेचच पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, उपायुक्त दीपक गिऱ्हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी पाहणी केली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

संपादन - गणेश पिटेकर