esakal | सहा महिन्याच्या बाळाचे शिर कापून फेकले, कवठीच्या वाड्याजवळ कुत्र्याच्या जबड्यात पाहिले
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

सहा महिन्याच्या बाळाचे कुणीतरी शिर कापून फेकल्याचा भयंकर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. हे शिर कुत्रा जबड्यात उचलून पळत असताना नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांना धडकीच भरली. 

सहा महिन्याच्या बाळाचे शिर कापून फेकले, कवठीच्या वाड्याजवळ कुत्र्याच्या जबड्यात पाहिले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सहा महिन्याच्या बाळाचे कुणीतरी शिर कापून फेकल्याचा भयंकर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. हे शिर कुत्रा जबड्यात उचलून पळत असताना नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांना धडकीच भरली. 

शहरातील राजाबाजार परिसरातील कवठीच्या वाड्याजवळ बुधवारी (ता. २९) सकाळी ६ वाजता हा प्रकार उघडकीस आला. कुत्रा हे शिर जबड्यात पकडून पळत असताना नागरिकांनी पाहिले. जवळच्याच एका सुरक्षारक्षकाने हा प्रकार पाहिला आणि आरडाओरड सुरू केली, तेव्हा कुत्रा ते तिथेच टाकून पळून गेला. 

या बाळाची कुणीतरी अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले आहे. सुरक्षारक्षकाने महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला ही माहिती देताच त्यांनी पोलिसांना कळवले. सिटीचौक पोलिसांनी धाव घेऊन ते मुंडके ताब्यात घेतले. पण बाळाचे धड काही सापडलेले नाही. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. 

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

कुणीतरी धारदार शस्त्राने ते शिर धडावेगळे केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, पहाटेच कुणीतरी ते कवठीच्या वाड्याजवळ आणून टाकले असावे, असे नागरिक सांगत आहेत. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हे शिर ताब्यात घेऊन ते स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे याच्या तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे.

हा गुप्तधनासाठीच्या नरबळीचा प्रकार आहे, की आणखी काही याचा तपास पोलिस करत आहेत. या भागातील महापालिकेचे सफाई कर्मचारी सतीष मगरे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.