संशयितांना अटक करण्यावरून पोलिस-नागरिकांत शाब्दिक वाद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकाते गेले होते

औरंगाबाद: घरासमोर सिगारेट ओढण्यास मनाई करताच चौघांनी मारहाण करुन चाकूने भोसकल्याची घटना २९ जानेवारीच्या रात्री दहादरम्यान कोकणवाडीत घडली होती. याप्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकाते गेले होते.

त्यांना काही महिलांनी अटकाव करत हुज्जत घातली. त्यावेळी उपनिरीक्षक देवकाते यांनी महिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत क्रांती नगरातील जमाव पोलीस आयुक्तालयात जमला होता. त्यांचे निवेदन स्विकारुन पोलीस अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची शहानिशा करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव निघून गेला.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनमोल सागर यांची मोठी कारवाई, वाळूतस्करांचे धाबे...

कोकणवाडी भागातील फारुक कुरेशी शेख चांद कुरेशी (३०) हे रात्री दहाच्या सुमारास मित्र इरफान बेग व इमाद खान यांच्यासोबत घराबाहेर बोलत उभे होते. त्यावेळी तेथे आलेले निखील बोर्डे, अजय, रावत आणि अजय खरात हे सिगारेट ओढू लागले. त्यामुळे कुरेशी यांनी चौघांना सिगारेट ओढण्यास विरोध केला.

त्यावरुन कुरेशी आणि चौघांमध्ये वाद झाला. या वादातून निखील बोर्डेने इमाद खान याच्या डोक्यात रॉड मारला. तसेच अजय व रावत यांनी लोखंडी पाईपने इरफान बेगला तर अजय खरात हा इमाद खानला चाकु मारत असताना कुरेशी यांना हातावर वार झेलला होता. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यातील कौंदरमध्ये चोरट्यांनी फोडली तीन घरे, लाखो रुपयांचा ऐवज...

महिलांचा पोलिसांना अटकाव 
या घटनेनंतर रविवारी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवकाते हे हल्लेखोरांना पकडण्यासाठी क्रांतीनगरात गेले होते. तेव्हा त्यांना काही महिलांनी हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी अटकाव केला. त्यामुळे महिला आणि देवकाते यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादानंतर देवकाते तेथेच असताना महिला आणि नागरिकांचा जमाव जमला. जमावाने थेट वरिष्ठांकडे तक्रार करतो असे म्हणत पोलीस आयुक्तालयात दाखल झाला.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भूमिका ठरणार महत्त्वाची, सर्वांचे लागले लक्ष

यावेळी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व विशेष शाखेच्या पोलिसांनी जमावाला पोलीस आयुक्तालयाबाहेर रोखून धरले. जमावातील काही जणांनी पोलीस विनाकारण अटक करत आहे. चौकशीनंतरच आरोपींना अटक करावी अशी मागणी करु लागले. नंतर उपायुक्त मिना मकवाना यांनी आयुक्तालयात धाव घेतली. मकवाना यांनी जमावाला शांततेचे आवाहन करत शिष्टमंडळाकडे निवेदनाची मागणी केली. जमावाने निवेदन दिल्यानंतर मकवाना यांनी वस्तुस्थितीची शहानिशा केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad crime news Verbal dispute between police and citizens over arrest of suspects