'त्याच' मुलीशी लग्न करण्यासाठी तरुणाने केला चक्क गोळीबार! 

aurangabag crime news
aurangabag crime news
Updated on

औरंगाबाद: ‘मुलाचे लग्न थांबव नाहीतर तुझ्यासह तुझ्या मुलाला खतम करीन, समजले का? नाहीतर दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगेन’ असा मजकूर असलेल्या धमकीच्या चिठ्ठ्या घराबाहेर फेकत दुचाकीवर आलेल्या दोघांनी हॉटेलच्या दिशेने गोळीबार केला. हा प्रकार ३० मार्चच्या पहाटे पडेगावातील रामगोपालनगर येथे घडला.

मनीष किसनराव गायकवाड (२३, रा. रामगोपालनगर, पडेगाव) हे वडील, आई व दोन लहान बहिणींसोबत राहतात. त्यांचे पडेगावात मनीष इन लॉजींग अँड रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. २५ एप्रिल २०२१ रोजी मनीष यांचे नगर जिल्ह्यातील चुलत मामाच्या हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या मुलीशी लग्न ठरले. तत्पूर्वी मनीष यांचा नातेवाईक विशाल मनोहर गाडीलकर (रा. कोपडी, ता. पारनेर, जि.नगर) याचा त्याच मामाच्या मुलीला दाखविण्याचा कार्यक्रम झाला होता. पण विशाल व तिच्यात नऊ वर्षे वयाचे अंतर आल्याने चुलत मामाने विशालला नकार दिला. 

पुढच्या वर्षी लग्न करु असे म्हणून वेळ मारुन नेत स्थळ नाकारले. त्यानंतर त्याच मामाच्या मुलीचा मनीष यांच्याशी विवाह ठरला. पण २५ फेब्रुवारीला मनीषचे वडील किसन गायकवाड यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज आला. त्यामध्ये ‘आम्ही सगळे समजावून सांगतो, त्या मुलीचा विचार सोडा.’ असे नमूद करण्यात आले होते. तसेच विशाल व त्यांच्या गावातील एक मुलाचे लग्न ठरलेल्या मुलीशी झालेल्या संभाषणाचे ऑडीओ क्लीप देखील किसन गायकवाड यांना पाठवली. मात्र, गायकवाड कुटुंबियांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन त्याच मुलीशी मनीषचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे लग्न ठरल्यानुसार होणार हे विशाल गाडीलकर व इतर नातेवाईकांना देखील माहिती होते. 

वेटरच्या अंगाला घासून गेली गोळी-
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे गायकवाड यांनी हॉटेल बंद केले. हॉटेलमध्ये काम करणारा शेख मुजफ्फर हा काऊंटरजवळ बिछाना टाकून झोपी गेला. तर गायकवाड कुटुंबिय हॉटेलमागील घरात झोपले. बुधवारी पहाटे दोन वाजून तीन मिनिटांनी फटाका फुटल्यासारखा आवाज आला. त्यामुळे लॉजमध्ये झोपलेला शेख मुजफ्फर याने आवाज देऊन मनीष यांना बोलावले. मनीष हे लगेचच झोपेतून उठून घराबाहेर आले. हॉटेलच्या मुख्य दरवाजाजवळ येताच त्यांना गनपावडरचा वास आला. म्हणून मनीष यांनी हॉटेलच्या दरवाजाजवळील काचेची पाहणी केली. तेव्हा त्यांना काचेला गोल आकाराचे छिद्र पडून तडे पडल्याचे दिसले.

तसेच हॉटेलात मुझफ्फरने अंगावर ओढलेल्या चादरीला गोळी चाटून गेल्याचे दिसले. त्यानंतर मनीष यांनी लॉजमधील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असता, हॉटेल समोरील रस्त्यावरुन दोघे दुचाकीने येऊन गोळ्या झाडत पसार झाल्याचे दिसून आले. हल्लेखोर नगर जिल्ह्यातील असून हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरच समोर येईल, असेही पोलिसांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com