जयाताईंनी आणला शेवयांना चॉकलेट, पेरू, सीताफळासह पालक, पुदिन्याचा फ्लेवर

औरंगाबाद : जया साबदे यांनी उत्पादीत केलेल्या फ्लेवरयुक्त शेवया
औरंगाबाद : जया साबदे यांनी उत्पादीत केलेल्या फ्लेवरयुक्त शेवया

वाट कितीही बिकट असली तरी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास शून्यातून स्वत:चे विश्‍व तयार करता येते, यापैकीच आहेत बीड बायपासवरील नाईकनगरातील जया जगदीश साबदे. कुटुंबाच्या चरितार्थासह उन्नतीसाठी लघुउद्योगाची छोटेखानी सुरवात करणाऱ्या जयाताईंनी शेवयांचे एक दोन नव्हे तर तब्बल १३ फ्लेवर तयार केले.

हे करताना त्यातील सत्त्व जपत या शेवयांची चव मॉरिशस, जर्मनी, अमेरिकेतील भारतीयांपर्यंत पोचवली आहे. त्यांचा ‘सिद्‌धी’ ब्रँड आता आपली ओळख निर्माण करतो आहे. काही वर्षांपूर्वी घर चालवण्यासाठी स्वत: काम शोधणाऱ्या जयाताईंनी २० ते २५ जणांना हक्काचा रोजगार मिळत आहे. मार्केटिंगसाठी पतीची मोलाची साथ लाभत आहे.

जगदीश साब‌दे यांच्याशी २००५ ला विवाह झाल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत वर्षभर नोकरी केली. शिक्षिका म्हणून काम पाहिले. सात-आठ महिने पोळी-भाजी केंद्र चालवले. त्यानंतर ज्वेलरी, रूखवत साहित्य आणून त्याचे वेगवेगळे डिझाईन तयार करुन ते विकण्याचे काम केले. २०११ मध्ये त्यांना मुलगी झाली आणि त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा मिरची पावडर आणि मसाले तयार करण्यासाठी ग्राइंडिग मशीन घेतली. महिला बचतगटातून कर्ज घेऊन जवळपास तीस हजार रुपयांची गुंतवणूक केली. दोन वर्षांनंतर त्यांना ग्राहकांची नेमकी गरज काय, याचा अंदाज आला. या अंदाजातून त्यांनी मिरची, मसाला उद्योगाला शेवयांच्या व्यवसायाची जोड दिली.

अन् वाढला व्यवसाय

जयाताई आधी २५ किलो ते एक क्‍विंटलपर्यंत विविध फ्लेवरच्या शेवया विकायच्या. आता जवळपास दहा क्‍विंटलपर्यंत मालाची विक्री करतात. वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी तासाला ४० किलो शेवया तयार करणारी मशीन घेतली असून, भाजीपाला, फळांची ग्रेव्ही, गव्हाची सोजी तयार करणारी अत्याधुनिक मशीनही बुक केली आहे. बारकोड, ट्रेडमार्कसाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असून, एका विक्री क्षेत्रातील कंपनीशी सुरू असलेल्या बोलणीतून त्यांच्या उत्पादित मालाला आता सुपर शॉपमध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

आपल्याला जे जमते त्यातच प्रावीण्य

पारंपरिक शेवयांच्या दर्जामुळे मागणी वाढली. यामुळे त्यांनी २०१४ मध्ये शेवया मशीन व शेडसाठी जवळपास एक लाख ४० हजारांची गुंतवणूक करण्याचे धाडस केले. माहेर औरंगाबादचेच, डिगांबरराव काळे (रावसाहेब काळे) यांच्या त्या एकुलती एक कन्या. जयाताई म्हणाल्या, ‘‘तसं आमचं सुखवस्तू कुटुंब; पण आईवडिलांकडून कष्ट करून जीवन व्यतीत करत आपली ओळख निर्माण करायची मिळालेली शिकवण आपण जपतो याचा मला खूप आनंद वाटतो.

मी प्रक्रिया कोर्स प्रशिक्षणातून प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात केले. पालेभाज्यावर व फळांवर प्रक्रिया करूनच १३ फ्लेवरच्यी शेवया तयार करत आहे. ही प्रक्रिया करीत असताना वापरलेली गव्हाची सोजी व पालेभाज्यांच्या सत्त्वाला कोणताही धोका पोचणार नाही याची खबरदारी घेणारे तंत्र त्यांच्या हाताने आत्मसात केलंय. शरबती गहू व फक्त सोजीचाच वापर करते. रवा वापरत नाही. एक किलो गव्हापासून केवळ ४५० ते ५०० ग्रॅमच शेवया तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्लेवर्ड शेवया

औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांमुळे फळप्रक्रिया, सोया प्रक्रिया व भाजीपाला प्रक्रियेचे तंत्र त्यांना अवगत झाले. यातून त्यांनी स्वत:चे कौशल्य वापरून सोजीपासून साध्या शेवयासह विविध फळे व भाजीपाल्याच्या जवळपास १३ फ्लेवरच्या शेवया बाजारात आणल्या. तसेच चॉकलेट, जांभूळ, आंबा, सीताफळ व पेरू, टोमॅटो, पुदिना, बीट, पालक, दुधाचा फ्लेवर शेवयात आणला आहे. सोयाबीनवर प्रक्रिया करून २० प्रकारचे पदार्थ त्या तयार करू शकतात. कुरडया, चकल्या, तांदळाचे पापडही त्या तयार करतात. दाळबट्‌टीचं पीठ नांदेड, परभणी, उस्मानाबाद, पुणे, नाशिक, नगर, बंगलोरपर्यंत पोचले आहे. हे पीठ व तळलेली दाळबट्‌टी खुसखुशीत असून, किमान महिनाभर चांगली राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

मेहनतीच्या बळावर त्यांना भुवनेश्‍वर येथे देशपातळीवरील प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे त्यांचे कौतुकही झाले. गुणात्मक दर्जा सांभाळल्याने त्यांच्या उत्पादित मालाची मागणी सातत्याने वाढते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com