थोर गणिती भास्कराचार्यांनी कुठे लिहिला लीलावती ग्रंथ... 

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, ते ठिकाण औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत आणि चाळीसगाव तालुक्यात आहे. या जागी आजही त्यांच्या नावाचा शिलालेख आहे. हे ठिकाण कोणते?

भास्कराचार्यांनी बाराव्या शतकात लीलावती हा ग्रंथ लिहिला. पायथागोरस प्रमेयाचा सोपा सिद्धांत, पृथ्वीचा परीघ निश्‍चित करण्याची सुलभ पद्धत, अनंत या संख्येची उत्तम व्याख्या, वर्तुळात नियमित बहुभुजाकृती कंपासाशिवाय रेखाटण्याची पद्धत अशी "लीलावती' ग्रंथाची खास वैशिष्ट्ये आहेत. भास्कराचार्य काळाच्या फार पुढे होते.

आज "पेल्स इक्वेशन' म्हणून जे समीकरण ओळखले जाते, ते भास्कराचार्यांनी 1150 मध्ये चक्रवाल पद्धतीने सोडविले. तेच समीकरण सोडविण्यासाठी युरोपीय गणितज्ज्ञांना सुमारे 600 वर्षे वाट पाहावी लागली. 1769 मध्ये जोसेफ लुई लॅंग्राज या फ्रेंच गणितज्ज्ञाने ते समीकरण सोडविले. "कॅलक्‍युलस'मधील "लिमिट' आणि "डिफरन्सिएशन'ची कल्पना भास्कराचार्यांना आली होती. त्यांची लेखन पद्धती सुरस, काव्यमय आणि शिस्तबद्ध, तर विषयांची मांडणीही अतिशय रेखीव आहे.

चाळीसगावपासून नैऋत्यला 17 किलोमीटरवर पाटणादेवी निसर्गरम्य ठिकाण आहे. 1864 मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी पाटणादेवी परिसराला भेट दिली आणि अल्लाउद्दीन खिलजीने उद्‌ध्वस्त केलेल्या चंडिकादेवी मंदिरातील शिलालेख शोधला. या शिलालेखामुळेच गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले आणि ते या परिसरात वास्तव्यास होते, हे सिद्ध झाले.

गणितसूर्य भास्कराचार्य प्रतिष्ठानचे राजेश ठोंबरे म्हणाले, भास्कराचार्यांच्या नावाने या जागेवर अभिमानाने दाखवता येईल आणि भावी पिढीला अभ्यासता येईल अशी गणितनगरी उभी राहावी, यासाठी सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. तत्कालीन अर्थमंत्र्यांनी 2015-16 च्या अर्थसंकल्पात जागतिक दर्जाची गणितनगरी पाटणादेवी येथे करण्याची घोषणा केली आहे.

अशी असेल गणितनगरी 

पाटणादेवीचा परिसर गौताळा अभयारण्यात येतो. वन विभागाच्या माध्यमातून गणितनगरी साकारली जाईल. सध्या वापरात नसलेल्या वन विभागाच्या जुन्या इमारतींमध्ये सुधारणा घडवून माहितीची विविध दालने सुरू होतील. याशिवाय भास्कराचार्य कुटीया, वस्तुसंग्रहालय, गणित संशोधन केंद्र, सिद्धार्थ शिरोमणी ग्रंथदालन, तारांगण, प्रेक्षागृह, विश्रामगृह यांसह पर्यटकांच्या व विशेषतः गणित अभ्यासकांच्या दृष्टीने आवश्‍यक सुविधा गणितनगरीत असतील.

विद्यापीठाद्वारे अभ्यासक्रम 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पुढाकार घेऊन भास्कराचार्य आणि वैदिक गणित यांच्यावरील स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी विद्यापीठातच भास्कराचार्यांच्या नावाने स्वतंत्र ग्रंथदालनही सुरू होणार आहे. त्यामुळे गणितासंदर्भातील संशोधनाला चालना मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com