Aurangabad Graduate Election Result Analysis : दिग्गज नेत्यांची हजेरी, तरीही भाजपचा पराभव

गणेश पिटेकर
Friday, 4 December 2020

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत भाजपने शिरीष बोराळकरांच्या प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेत्यांना उतरवले. मात्र महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवून बोराळकरांना पराभूत केले आहे.

औरंगाबाद  : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी ५७ हजार ८९५ मतांनी पराभव केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आदींनी बोराळकरांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आशिष शेलार, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक भाजपचे दिग्गज नेते बोराळकरांच्या प्रचारात उतरली होती.

मात्र त्यांचा काहीही उपयोग निवडणूक निकालावर झालेला दिसला नाही. शिरीष बोराळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धडक प्रचार राबवला होता. भाजपमध्ये जनसंपर्क असलेली अनेक नेते आहेत. त्यांना निवडणूक लढण्यास संधी न दिल्याचे दिसल्याने अनेकांची नाराजी पत्कारत बोराळकरांना उमेदवारी देण्यात आली. ही एक प्रकारे पदवीधर मतदारांवर लादलेला उमेदवार असल्याने भाजपमधील अनेकांनी एकीने निवडणुकीत काम केल्याचे दिसले नसल्याची चर्चा लोकांमध्ये पाहायला मिळाली. याबाबत‘सकाळ’चे पत्रकार प्रकाश बनकर सांगतात, की भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स होता. त्यामुळे बोराळकर यांना फटका बसला.

गेली सहा वर्षे पदवीधरांचे प्रश्‍न घेऊन लढल्याचे बोराळकर दिसले नसल्याच्या चर्चा रंगल्या. तसेच आपल्या मतदारांशी सतत संपर्कात राहणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी रिंगणात कोणतीही पूर्वतयारी न करता उतरल्यावर पराभव येणार ना! बोराळकर यांची ही दुसरी संधी होती. त्यांनी पहिल्या निवडणुकीतील पराभवाची मीमांसा केली नसल्याचे मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट होते. पदवीधर हा उच्च शिक्षित मतदार असतात. त्यांनी भाजपचे केंद्र सरकारच्या काळातील धोरणांचाही विचार केलेला असेल हे नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Graduate Election Result Analysis