Aurangabad Graduate Election Update : ‘पदवीधर’साठी मतदानाला सुरवात, बोराळकरांनी बजावला मतदानाचा हक्क

ई सकाळ टीम
Tuesday, 1 December 2020

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज मंगळवारी (ता.एक) मतदानाला सुरवात झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज मंगळवारी (ता.एक) मतदानाला सुरवात झाली आहे. औरंगाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मतदानासाठी आलेले राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी बोराळकर यांना शुभेच्छा दिल्या.आठ जिल्ह्यांतील तीन लाख ७४ हजार ४५ मतदार ३५ उमेदवारांचे भाग्य निश्चित करतील. ८१३ केंद्रांवर सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, भाजपचे शिरिष बोराळकर यांच्यासह ३५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतदार करतील.

महाविकास आघाडी आणि भाजपकडून दिग्गज नेत्यांनी प्रचार केला होता. अन्य पक्ष, अपक्ष उमेदवारांनीही आपल्या परीने प्रचार केला आहे. मतदारांना मतदानासाठी मतपत्रिकेसोबत पुरविलेल्या जांभळ्या स्केचपेनचा वापर करावा लागेल. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल आदींचा वापर करता येणार नाही. पसंतीक्रम देताना तो अंकात द्यावा लागेल. १ हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर टाकावा लागेल. जेवढे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तेवढे पसंती क्रम मतदारांना मतपत्रिकेवर नोंदविता येतील.

 

जिल्हा- मतदार- मतदार केंद्रे
औरंगाबाद- १०६३७९ (२०६)
जालना- २९७६५ (७४)
परभणी- ३२६८१ (७८)
हिंगोली- १६७६४ (३९)
नांदेड- ४९२८५ (१२३)
बीड- ६४३४९ (१३१)
लातूर- ४११९० (८८)
उस्मानाबाद- ३३६३२ (७४)
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Graduates Constituency Election Update