लोकांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे, असे सुसाईड नोट लिहून औरंगाबादचा उद्योजक बेपत्ता

सुषेन जाधव
Tuesday, 16 February 2021

जालना एमआयडीसीतील नवीन मोंढ्यामागे संदीप आर्सुड यांची फरसाणची कंपनी आहे.

औरंगाबाद : उद्योग उभारणीसाठी अठरा जणांकडून टप्प्या-टप्प्याने व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करताना दमछाक झालेल्या तरुण उद्योजकाने सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला. दरम्यान, शोधाशोध केल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी कुटुंबियांना सुसाईड नोट आढळली. ही सुसाईड नोट उस्मानपूरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

संदीप दयानंद आर्सुड (३३, ह. मु. उस्मानपूरा, मुळ रा. हिमायतबाग, फॉरेस्ट कॉलनी, दिल्ली गेट) असे बेपत्ता झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. जालना एमआयडीसीतील नवीन मोंढ्यामागे संदीप आर्सुड यांची फरसाणची कंपनी आहे. ही कंपनी उभारण्यासाठी २०१६ मध्ये त्यांनी जालन्यातील अनेक जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशांचे व्याज वाढतच गेले. त्यामुळे आर्सूड आर्थिक विवंचनेतून मानसिकदृष्ट्या खचले. त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी पत्नी बाहेरगावी लग्न समारंभासाठी गेल्याची संधी साधून सुसाईड नोट लिहून घर सोडले.

काय आहे सुसाईड नोट?
आर्सुड यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माझ्यावरचे कर्ज आणि व्यवसायात होणारे सततचे नुकसान आज रोजी पंधरा लाख रुपये आहे. लोकांच्या सततच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे. माझी आजची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती ठिक नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मरणाचा विचार करत आहे. आई, पप्पा, रवि भाऊ आणि पत्नी ज्योती मला माफ करा, मी पाच वर्षापासून तुम्हाला खूप त्रास दिला. माझे स्वप्न होते की माझ्या कामामुळे मी सर्वांना खुश ठेवेन. पण तसे झाले नाही.

मी कोठून आणणार तेवढे पैसे आता माझ्यात क्षमता राहिली नाही. मी आता खूप थकलो आहे. खूप लोकांना त्रास दिला आहे. एकाचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे घे. तर दुसऱ्याचे कर्ज फेडण्यासाठी तिसऱ्याकडून घे असे करत करत कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. वाढत्या महागाईमुळे माझ्या कामात उत्पन्न राहिले नाही. आता काम सुरू केले तरी माझ्याकडे सगळ्यांना देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. त्यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. माझ्या घरच्यांना कोणीही त्रास देऊ नये.’ असे त्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. यावरुन उस्मानपूरा पोलीस ठाण्यात आर्सुड यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Industrialist Disappeared After Writing Suicide Note Aurangabad Crime News