ऐतिहासिक चित्रपटांसाठी तारतम्य आवश्‍यक ! 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करतांना काही प्रमाणात बदल करावा लागतो. मात्र, हा बदल करतांना तारतम्य बाळगणे आवश्‍यक आहे, असे परखड मत गुरुवारी (ता.सहा) औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आयनॉक्‍स प्रोझोनमध्ये आयोजित हिस्ट्री अँड सिनेमॅटीक लिबर्टी या परिसंवादात दिग्दर्शकांनी व्यक्त केले. 

यापरिसंवादामध्ये अभिनेता प्रसाद ओक, तान्हाजीचे दिग्दर्शक ओम राऊत, फर्जंद व फत्तेशिकस्तचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांना अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी बोलते केले. तसेच उपस्थित श्रोत्यांनी चित्रपट आणि इतिहास या विषयावर काही प्रश्‍नही उपस्थित केले. श्री. लांजेकर म्हणाले की, चित्रपट हा ऐतिहासिक दस्तावेज नाही, तो सांस्कृतिक दस्तावेज आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट पाहतांना प्रेक्षकांनीही जागरुक होऊन बघायला हवा. ही जबाबदारी केवळ दिग्दर्शकाचे नव्हे.

इतिहास हे अपडेट होणारे शास्त्र आहे, असे इतिहासतज्ज्ञ कायम सांगत आले आहेत. इतिहास अपडेट झाल्याने त्यातून अनेक गोष्टी समोर येत असतात. त्यामुळेच इतिहास हा दिवसेंदिवस समृद्ध होत जातो. मी स्वतः ऐतिहासिक विषयांना हात घालतांना इतिहासाशी संबंधित दस्तावेजांचा अभ्यास करतो आणि त्यातूनच कथानक निवडून खरा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.

इतिहासातील काही घटना आपल्यासमोर चित्रपटांच्या माध्यमातून मांडल्या जात असतात. इतिहास व चित्रपटांचे दुवे जोडतांना सिनेमॅटीक लिबर्टी दिग्दर्शक म्हणून आम्ही घेतो. त्या- त्या काळातील पात्रांशी अवहेलना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ऐतिहासिक चित्रपट व सोशलमीडियावरील ट्रोलिंग हे ठरलेले समीकरण बनत चाललय. पण एखादा चित्रपट व त्याच्या दिग्दर्शकाला ट्रोल करण्यापूर्वी इतिहासाचा अभ्यास करा, त्यानंतरच त्यावर मत व्यक्त करा. ट्रोलिंग उथळ असते.

सिनेमा हे लोकप्रिय माध्यम असल्यामुळे ट्रोलिंगच्या माध्यमातून काहीजण उथळ प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात, हे मागील काही दिवसांमध्ये समोर येत आहे. त्याचप्रमाणे नवी पिढी पुस्तकांपासून दूर चालली आहे, ही चिंताजनक बाब आहे. ऐतिहासिक चित्रपटांचा आधार घेत नवी पिढी पुन्हा पुस्तकांकडे वळायला हवी. खरा इतिहास तपासल्यानंतरच सोशलमीडियावर ट्रोल करा, असा सल्लाही श्री. लांजेकर यांनी दिला. 

इतिहासाशी कुठल्याही प्रकारची छेडछाड नाही

तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले, की लोकमान्य या चित्रपटात इतिहासाशी कुठल्याही प्रकारची छेडछाड करण्यात आली नाही. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील काही प्रसंग चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. या चित्रपटाचा परफेक्‍ट असा कुठलाही शेवट नाही. तान्हाजी चित्रपटाचा शेवट हा ठरलेला होता. ज्यात तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला. पण छत्रपती शिवाजी महाराज व सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्यातील शेवटचा प्रसंग ही सिनेमॅटीक लिबर्टी होती.

खरे पाहता शेवट कंटाळवाणा होऊ नये, प्रेक्षक खुर्चीला खिळून राहावा यासाठी ही सिनेमॅटीक लिबर्टी होती. चित्रपटाकडे पाहण्याचा प्रत्येक दिग्दर्शकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असतो. त्यादृष्टीने तो चित्रपट बनवत असतो. त्याला त्याच्या चित्रपटात कोणते प्रसंग दाखवायचे आहे, हे तो त्यावरून ठरवित असतो. पण हे करतांना तारतम्य प्रत्येकानेच बाळगायला हवे. मी तान्हाजी चित्रपटात सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना नृत्य करतांना दाखवले.

तान्हाजी मालुसरे खरोखर नृत्य करत असतील का?

अनेकजण मला विचारतात की, तान्हाजी मालुसरे खरोखर नृत्य करत असतील का? यावर माझे उत्तर हो असेच आहे. अनेक ऐतिहासिक दस्तावेजांवर गोंधळ हा लोककला प्रकार करायचे, असा स्पष्ट उल्लेख आहे. पण मी तेथे सिनेमॅटीक लिबर्टी घेऊन शंकरा, शंकरा हे गाणे दाखविले. त्यातही इतिहासाची छेडछाड न करता तारतम्य बाळगले, असेही श्री. राऊत म्हणाले. 

आपल्या हिरकणी या ऐतिहासिक चित्रपटाबाबत प्रसाद ओक म्हणाला की, हिरकणी हे पात्र त्या काळात होते की नाही, असा वाद होतोय. कोणी म्हणतोय ती होती, कोणी नाही. पण माझ्या मते हा चित्रपट मातृत्त्वाशी संबंधित आहे. आई तेव्हा होती, आता आहे आणि पुढेही राहणार आहे. त्यामुळेच तिचे मातृत्त्व दाखविण्यासाठी हा चित्रपट मी केला. या चित्रपटात दाखविलेले शिवराज्यभिषेक गीताचा प्रसंग सिनेमॅटीक लिबर्टी म्हणावी लागेल. यात अनेक लोककलाप्रकारांच्या आधारे हे साडेनऊ मिनिटांचे गाणे तयार झाले आहे.''

महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन 

औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्‍टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्‍टर चंद्रकांत कुलकर्णी, अजीत दळवी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्‍टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, किशोर निकम, सुबोध जाधव, महेश देशमुख आदींनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com