
एका दुचाकीस्वाराला वाचविताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सहा जणांचा मात्र नाहक जीव गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा अपघात कैद झाला.
औरंगाबाद : औरंगाबादहून एक कुटुंब कारने बुधवारी (ता. 26) सकाळी पावणेदहाच्या सुमारास अकोल्याला जात होते. त्यावेळी रस्ता ओलांडणारा दुचाकीस्वार पुढे येताना पाहून चालकाने कार दुभाजकाककडे वळविली. पण त्याचे संतुलन बिघडले अन..
समोरुन येणाऱ्या प्रवाशांच्या रिक्षाला कारची जोरदार धडक बसली. यात रिक्षातील प्रवासी उंच उडून पडले. यात सहा महिन्याच्या बाळासह एकूण सहा जण ठार झाले. एका दुचाकीस्वाराला वाचविताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सहा जणांचा मात्र नाहक जीव गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा अपघात कैद झाला.
शेकटा येथील अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी पेट्रोल पंप परिसरातून काही फुटेजही गोळा केले. शेकटा शिवारात अमृतसर पेट्रोलपंपाजवळ हा अपघात घडला. हा अपघात अत्यंत भयानक, अंगावर शहारे आणणारा होता. डोळ्यांनीही बघवत नव्हता. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.
जालना येथील जाधव कुटुंबीय रिक्षाने औरंगाबादेत एका नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला बुधवारी सकाळी येत होते. प्रथमदर्शनी औरंगाबाद-जालना मार्गावर औरंगाबादेतून अकोलाकडे वेगाने जाणाऱ्या कारचालकाच्या लेनमध्ये अचानक दुचाकीस्वार पुढे आला. कदाचित त्याला रस्ता ओलांडायचा होता, हे समजुन अपघात टळावा म्हणून कारचालकाने कार वेगातच दुभाजकाकडे वळविली खरी.
ही मूळ बातमी - सहा महिन्यांचं बाळ आईच्या कुशीत होतं. पण...
पण चालकाचे नियंत्रण सुटुन कार अमृतसर पेट्रोल पंपासमोरील दुभाजकावर चढून जालनाहून येणाऱ्या रिक्षावर जाऊन आदळली. रिक्षातील प्रवासी अक्षरश: उंच उडून जमिनीवर कोसळले. तर कारचा वेग जास्त असल्याने रिक्षा काही अंतर घसरत गेली. हे दृष्य भयावह होते. रिक्षातील पाच, तर कारमधील एकाचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.
यांचा झाला मृत्यू...
ऍपेरिक्षातील दिनेश रामलाल जाधव (वय 32), रेणुका दिनेश जाधव (26), अतुल दिनेश जाधव (सहा महिने), वंदना गणेश जाधव (27), सोहम गणेश जाधव (नऊ, सर्व रा. शंकरनगर, जुना जालना) व कारमधील संजय हरकचंद बिलाला (रा. माहेश्वरी भवन, अकोला) यांचा मृत्यू झाला.