esakal | कशी जुळली ब्रिटिश चित्रकार रॉबर्ट गिल आणि पारोची प्रेमकथा?

बोलून बातमी शोधा

robert gill and paro love story

चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा लेणी जगासमोर मांडणारा चित्रकार म्हणजेच रॉबर्ट गिल

कशी जुळली ब्रिटिश चित्रकार रॉबर्ट गिल आणि पारोची प्रेमकथा?
sakal_logo
By
जितेंद्र जोशी

अजिंठा (औरंगाबाद): चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा लेणी जगासमोर मांडणारा चित्रकार म्हणजेच रॉबर्ट गिल. आज त्याचा 141 वा स्मृती दिन. 1843 पर्यंत रॉबर्टने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून 1844 ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी अजिंठा येथे नियुक्ती दिली.

रॉबर्ट गिल मे 1845 ला सुरक्षा जवानांसह तो अजिंठ्याला आला. अजिंठा येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहात होता. त्या ठिकाणी आज ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. त्यासमोरील प्रवेशद्वारावर असलेल्या इमारतीत रॉबर्ट गिल अनेक वर्षे राहिला. त्याला स्थानिक गिल टोक म्हणून ओळखतात. अजिंठा येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या पारो या भारतीय तरुणीशी त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. आज हीच प्रेम कथा जगभरात प्रसिद्ध पावली आहे.

यावर “अजिंठा नावाचा एक मराठी चित्रपट ही येऊन गेला आहे. चित्रनिर्मितीच्या कामात पारो ही देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने झिडकारून रॉबर्ट गिलला चित्रकामात मदत करायची. 11 वर्षांच्या सहवासानंतर पारो हिचा 23 मे 1856 रोजी अजिंठा येथे आकस्मित मृत्यू झाला.आपल्या प्रियसीबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर अजिंठा येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात बनविली. त्यावर ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या.

रॉबर्ट गिलने अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, अजिंठा परिसरातील मंदिरे, मुघल वास्तुकला यांची छायाचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. ब्रिटीश शासनाकडून रॉबर्ट गिलवर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अथक परिश्रमाने त्याने मार्च 1870 ला हे काम पूर्ण केले आणि 1873 ला हा ठेवा त्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारला सुपूर्द केला होता.

खान्देशच्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलला रॉबर्ट गिलचे उष्माघाताने 10 एप्रिल 1879 ला निधन झाले. त्याच्या निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनलाच लागून असलेल्या सेंट पॉल चर्चच्या दफनभूमीत त्याचे दफन करण्यात आले, तेथे त्याचे थडगे आजही आहे. एक प्रज्ञावंत अष्टपैलू कलाकार खानदेशच्या मातीत विलीन झाला. कधी काळी कुंचल्याच्या प्रेमात गुंतलेला व सुरक्षा रक्षकांच्या गारुडात असलेला रॉबर्ट गिलच्या थडग्याभोवती आज गवताचा अन अस्वच्छतेचा वेढा असतो.

अजिंठा येथील पारोची कबर व भुसावळ येथील रॉबर्ट गिल याची कबर दोन्ही स्थळे भारतीय पुरातत्व विभागाने सरंक्षित स्मारक म्हणून घोषित करावी.
स्थानिक संशोधक - विजय पगारे

ज्या राबर्ट गिल ने अजिंठा लेणी पुर्नज्जीवीत केली. बौध्द लेणी जगाच्या पटलावर आणली अश्या जगविख्यात प्रतिभावंत चित्रकार राबर्ट गिल यांच्या भुसावल येथील कबर शुशोभीकरणासाठी पुरातत्व  विभागाने निधी उपलब्ध् करून दयावा.
-फादर किशोर गायकवाड भुसावळ चर्च

(edited by- pramod sarawale)