थरार! सहा वर्षीय शौर्यला सोडवण्यासाठी पोलिसांना विकावी लागली पाणीपुरी...

waluj news
waluj news

वाळूज (औरंगाबाद): शेजारच्या घरावरून किचन रूममध्ये प्रवेश करून सहा वर्षीय मुलाचे अपहरण करत संस्थाचालक असलेल्या त्याच्या आईकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र पोलिसांनी तांत्रिक बाबींचा वापर करून अवघ्या तीन तासांत आरोपीस जेरबंद करत सहा वर्षीय बालकाची सुखरूप सुटका केली. हा प्रकार वाळूज परिसरातील वडगाव (को) गट नंबर 11 मध्ये सोमवारी (ता.12) रोजी सकाळी घडला.

वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथील गट नंबर 11 मध्ये पौर्णिमा सोमशेखर हिरेमठ ही महिला कुटुंबासह राहते. पती किराणा दुकान चालवतात तर ही महिला अंबेलोहळ येथील सनराइज् इंग्लिश स्कूलची संस्थाध्यक्षा आहे. दोन मधले असलेल्या इमारतीत हे कुटुंब वरच्या मजल्यावर राहतात. तर खालच्या मजल्यावरील एक दुकान व दोन रूम भाड्याने दिलेल्या आहेत. भाड्याने राहणाऱ्या एका भाडेकरूंचा भाऊ संतोष रमेश सनान्से (29) रा.उंडणगाव ता.सिल्लोड, हल्ली मु.रांजणगाव (शेणपुंजी) याने हिरेमठ यांच्या सहा वर्षीय मुलाचे सोमवारी (ता.12) सकाळी 7.30वाजेच्या सुमारास घरातून अपहरण केले.

तुझ्या घरात चोर शिरले आहेत, तू चुपचाप बस. असे म्हणून आरोपीने सहा वर्षीय मुलाला दुचाकीवरून पळवून नेले. त्यानंतर अर्ध्या तासाने आरोपीने संस्थाचालक असलेल्या हिरेमठ यांना फोन करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मुलांना जिवंत सोडणार नाही. अशी धमकीही आरोपीने त्यांना दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या हिरेमठ यांनी पतीला व पोलिस यंत्रणेला ही माहिती देण्यात आली.

तीन वेळा बदलले लोकेशन -
अपहरण केल्यानंतर मागितलेली 20 लाख रुपये खंडीणी घेण्यासाठी आरोपीने तीन वेगवेगळ्या सिमवरून फोन केले. शिवाय पोलिस आपल्या मार्गावर असतील याचा अंदाज बांधून त्याने तीन ठिकाणी लोकेशन देत शेवटी हायटेक कॉलेज समोर एक मुलगा तुमची वाट पाहत आहे, त्याच्याकडे पैसे द्या. पैसे मिळताच महाराणा प्रताप चौकात तुम्हाला तुमचा मुलगा मिळेल, असे सांगितले.

आंबे व पाणीपुरी विकण्याचा बनाव -
मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वाबळे व गुन्हे शोध पथकाने तात्काळ तीन वेगवेगळे पथके निर्माण करून सापळा लावला. त्यात काही पोलिसांनी आंबा विकण्याचा तर काहींनी पाणीपुरी विकण्याचा बनाव केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे लोकेशन घेतले.

तीन तासांत आरोपी जेरबंद -
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेगवेगळे पथके तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन तीन तासाच्या आत त्याला जेरबंद केले. विशेष म्हणजे आरोपीच्या ताब्यातून सहा वर्षीय मुलगा सुखरूप सोडवला.

मुलाची सुखरूप सुटका -
आरोपीने मुलाला रांजणगाव (शेणपुंजी) येथील घरात लपवून ठेवले. तेथून तो पैशाची मागणी करत होता. पोलिसांनी त्याचा माग काढून त्याचे घराची हेरगिरी केली व खात्री होताच झडप घालून आरोपीला जेरबंद करत मुलाची सुखरूप सुटका केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com