Aurangabad Lockdown: 'लॉकडाऊन नको, आर्थिक आधार द्या'

प्रकाश बनकर
Thursday, 8 April 2021

आम्हाला व्यापारी आस्थापना सुरु ठेवण्यास मुभा देत आर्थिक मदत द्यावी, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली

औरंगाबाद: राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावले. गेल्या लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेता लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नाही. यामुळे आम्हाला व्यापारी आस्थापना सुरु ठेवण्यास मुभा देत आर्थिक मदत द्यावी, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

व्यापारी म्हणतात, नुकसानीच्या तुलनेत भरपाई द्या- 
जगन्नाथ काळे (अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ): गेल्या वर्षांत लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाला मदत केली. आर्थिक नुकसान सोसून व्यापारी अस्थापना बंद ठेवल्या. कामगारांनी विनाकामाचे पगार दिले. हे अनेक महिने सहन केले. आज पुन्हा याच परिस्थितीवर आलो आहोत. गेल्या वर्षभर रिझर्व फंडची कमाई संपून गेली. पुन्हा लॉकडाऊन लागत असल्यामुळे पुन्हा कर्जाच्या खाईत जाण्याची वेळ आली आहे. यामुळे आतातरी लॉकाडाऊन नसावे किंवा शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावीत.

Corona Updates: लातुरात कोरोनाचा कहर! २४ तासांत ९६९ नवीन रुग्ण

अन्यथा रस्‍त्यावर उतरू-
विजय जैस्वाल (उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ) : गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात आम्ही सरकारला साथ देऊनही कसलीच मदत आम्हाला सरकारने केली नाही. उद्योगानंतर व्यापारी हा सर्वाधिक रोजगार देणारा घटक आहे. अकुशल कामगारांना आम्ही रोजगार देतो.हे असंघटीत असल्यामुळे सरकारकडे नोंद नाही. गेल्या लॉकडाऊनमुळे प्रचंड हानी झाली. आता पुन्हा त्या दिशेने जात आहोत. हे बरोबर नाही. यामुळे व्यापारी आस्थपना बंद ठेवू नयेत. अन्यथा रस्त्यावर उतरू. 

सर्वसामान्य म्हणतात... बेरोजगारीला निमंत्रण 
सागर डवणे (कामगार) : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत. यामुळे लॉकडाऊनचे नाव काढले की अंगावर शहारे येतात. आता पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अनेकांची नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अनेकांचे पगार कपात केली जाते. लॉकडाऊन म्हणजे बेरोजगारीला एकप्रकारे आमंत्रण आहे.

Break The Chain: निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांचा रोष; शुक्रवारपासून दुकाने...

अनेकजण उध्दवस्त झाले-
अशोक शेळके (व्यापारी): आमचा कृषी केंद्रचालकांचा ठरावीक सीझन असते. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळात मोठा फटका बसला. यंदा चांगले राहिल असे वाटले होते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच अवस्था झाली आहे. लाखो, कोट्यावधी रुपयांचे कर्ज होऊन पडले. हे सगळे एका लॉकडाऊनमुळे झाले. आता तसेच झाले तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Lockdown news Do not Lockdown Give Financial Support Aurangabad traders demand