...तर अर्धे शहर होईल खंडहर, का दिला आयुक्तांनी इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, अशांसाठी 31 मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे. जे मालमत्ताधारक मुदतीत भोगवटा घेणार नाही, त्यांनी 31 मार्चनंतर कारवाईसाठी सज्ज राहावे असा इशाराही आयुक्तांनी गुरुवारी दिला. 

औरंगाबाद- इथे जंगलराज चालणार नाही, नियम तर पाळावेच लागतील. मोठी मोठी बांधकामे करायची आणि नियम पाळायचेच नाहीत, हे चालणार नाही. परवानगी घेऊन बांधकाम केले असेल तर भोगवटा प्रमाणपत्र घेतलेच पाहिजे. 31 मार्चपर्यंत भोगवटा प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मुदतीत प्रमाणपत्र घेतले नाही तर कारवाईसाठी सज्ज राहावे, असा इशारा महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (ता. दोन) दिला. 

हेही वाचा - मुलांमध्ये वारकरी संस्कार रुजवणारे गाव कोणते

शहरात भोगवटा प्रमाणपत्रांचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतल्यानंतर बांधकाम केले जाते; मात्र इमारतींचा वापर करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र घेतले जात नाही. अनेक बांधकाम व्यावसायिक व मालमत्ताधारक महापालिकेच्या बांधकाम परवानगीपेक्षा अतिरिक्त बांधकाम करतात. हे अतिरिक्त बांधकाम दंड आकारून नियमित करता येते. त्यासाठी महापालिका दंड आकारते. हा दंड टाळण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र घेण्यास कोणी समोर येत नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र घेण्याचे वारंवार आवाहन केले; मात्र उपयोग झाला नाही.

आता आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हा विषय महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी ऐरणीवर घेतला आहे. त्यांनी महापालिकेने मागील वीस वर्षांत किती बांधकाम परवानगी दिल्या व किती जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले याची माहिती मागविली आहे. ज्यांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, अशांसाठी 31 मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे. जे मालमत्ताधारक मुदतीत भोगवटा घेणार नाही, त्यांनी 31 मार्चनंतर कारवाईसाठी सज्ज राहावे असा इशाराही आयुक्तांनी गुरुवारी दिला. 

शहरातील बेकायदा बांधकामांचे प्रमाण पाहता, काय कारवाई करणार असा प्रश्‍न केला असता आयुक्त म्हणाले, मी इथे निर्माणासाठी आलो आहे, तोडण्यासाठी नाही. सर्वच बेकायदा बांधकामे तोडायची झाल्यास अर्धे शहर खंडहर होईल. गुंठेवारी वसाहती व मोठे बेकायदा बांधकामे हा वेगवेगळा विषय असून, गुंठेवारीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले. 

परिस्थितीनुसार कामे करू 
तिजोरीत पैसे नसतील तर कामे कशी होणार. सध्या तिजोरीची अवस्था नाजूक आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत सर्व वॉर्डात पाच-पाच लाखांपर्यंचीच कामे करू, असेही आयुक्त म्हणाले. सध्या अडीचशे ते 300 कोटींची बिले थकीत आहेत. त्यामुळे वॉर्डात मोठी कामे झालेली आहेत, असा दावा आयुक्तांनी केला.

हे वाचलंत का?- Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Commissioner's warning