
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वासही व्यक्त करत आमच्यात मतभिन्नता असली तरी आमची खरी कुस्ती ही भाजप आणि एमआयएमशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले
जालना: सध्या प्रकाशात असणारा मुद्दा म्हणजे औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबद्दल काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचं मत मांडलं आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे की नाही याबाबत मी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या मताशी सहमत आहे, अशी भूमिका मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जेंव्हा याविषयी बोलतील आणि जेंव्हा हा विषय सरकारकडे येईल तेंव्हा बसून ठरवू, असे चव्हाण पत्रकारांशी बोलताना सांगितले.
औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडीत कुरबूर सुरू आहे. शिवसेनेने या नामांतराला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शविला आहे.
शहराचे नाव बदलून पाणी, रोजगार मिळेल का? औरंगाबाद पालिका निवडणुकीत आप उमेदवार देणार
काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरूच्चार चव्हाण यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. ते म्हणाले, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचे आहे, असं अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. जेंव्हा हा विषय सरकारकडे चर्चेला येईल तेव्हा बसून ठरवू.
औरंगाबादचे नामांतर हा महाविकास आघाडी सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असं सांगत या विषयावर अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वासही व्यक्त करत आमच्यात मतभिन्नता असली तरी आमची खरी कुस्ती ही भाजप आणि एमआयएमशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?
नामांतराच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी तीन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत. नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.
(edited by- pramod sarawale)