शहराचे नाव बदलून पाणी, रोजगार मिळेल का? औरंगाबाद पालिका निवडणुकीत आप उमेदवार देणार

प्रकाश बनकर
Sunday, 3 January 2021

निवडणुका येण्यापूर्वीच शहराच्या नामांतराचा विषय निघतो. गेली दहा वर्षे सत्ता असताना शहराचे नाव बदलता आले नाही. आता हा विषय पुन्हा सुरु झाला आहे.

औरंगाबाद : निवडणुका येण्यापूर्वीच शहराच्या नामांतराचा विषय निघतो. गेली दहा वर्षे सत्ता असताना शहराचे नाव बदलता आले नाही. आता हा विषय पुन्हा सुरु झाला आहे. खरेच शहराचे नाव बदलून पाणी, चांगली आरोग्य सेवा आणि रोजगार मिळतील का? मुळ प्रश्‍न सुटतील का, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगादादा राचुरे यांनी उपस्थित केला. नामांतराऐवजी औरंगाबादकरांच्या मुख्य समस्यांचा शोध घेत त्या सोडविण्यासाठी महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याचेही श्री. राचुरे यांनी शनिवारी (ता.२) पत्रकार परिषदेत सांगितले.

 

 

 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यात पहिल्यांदाच आम आदमी पक्षही उतरणार आहेत. याच दृष्टीने औरंगाबाद महापालिका निवडणूकीत सर्व जागा लढविणार आहेत. याचा आढावा घेण्यासाठी श्री. राचुरे शहरात आले होते. ते म्हणाले, की आगामी काळात कोल्हापूर, औरंगाबाद, ठाणे, मुंब्रा, नवी मुंबईची महापालिका निवडणूक आम आदमी पक्ष लढविणार आहे. औरंगाबादेत जाती-धर्मावर निवडणूका लढविल्या जातात, मात्र आम्ही शहरातील प्रमुख पाणी, आरोग्य सेवा,कचरा व्यवस्थापन आणि रोजगार हे विषय घेऊन निवडणूक लढविणार आहोत.

 

 

 

 

सध्या आमच्याकडे ५० उमेदवार आहेत. मात्र आम्ही सर्व जागा लढविणार आहोत. यात आमच्या विचारसरणीशी समरस असलेल्या संघटनांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या निवडणूकीत तरूणांना संधी देणार आहे. यासाठी आम्ही शहरातील प्रत्येक वार्डातील समस्यांचा जाणून घेणार आहेत. यासाठी इच्छुक आणि त्यासोबत ५ जण सर्व्हे करणार आहोत. आपचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुभाष माने, संघटनमंत्री सुग्रीव मुंडे, शहर कार्याध्यक्ष इसाक अंडेवाल, उपाध्यक्ष वैजनाथ राठोड, सचिव अशीर जयहिंद, सतीश संचेती, मंगेश गायकवाड, दत्तू पवार, अर्चना टाक, डॉ. रोहित बोरकर, गौरव भार्गव, लतिफ खान उपस्थित होते.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP Will Contest Aurangabad Municipal Corporation Elections