कोविड-19 लसीकरण केंद्रावरील पथके प्रशिक्षणासह सज्ज ठेवा - जिल्हाधिकारी चव्हाण

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

लसीकरण केंद्रांमधील सर्व आवश्यक सुविधा, स्वच्छता, पूरक बाबींची व्यवस्था यासह पूरेशा प्रमाणात मनुष्यबळ, लसीकरण पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून लसीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात येणारे पथके प्रशिक्षणासह सज्ज ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित काविड-19 लसीकरण जिल्हा कृतीदलाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी पोलिस आयुक्त निखील गुप्ता, महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. वाघ जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

तरुणाच्या अंत्यविधीस नातेवाईकांचा नकार; ट्रॅक्टरच्या धडकेत झाला होता मृत्यू

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी लसीकरणासाठी सर्वांची पूर्व नोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्यांना लसीकरणाची वेळ, ठिकाण, दिनांक याबाबतची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारा देण्यात येईल. जिल्ह्यात लसीकरणासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात येत असून शासनस्तरावरून लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल, असे सांगून उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी तालुका स्तरावर चोख नियोजन ठेवावे. लसीकरण केंद्रांमधील सर्व आवश्यक सुविधा, स्वच्छता, पूरक बाबींची व्यवस्था यासह पूरेशा प्रमाणात मनुष्यबळ, लसीकरण पथकांची नियुक्ती करावी. सर्व संबंधितांना पूर्व प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष लसीकरण संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. तसेच लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन  करणे बंधनकारक आहे, असे सूचित केले.

त्याचबरोबर लसीकरण केंद्रावरील पथकातील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करावी. सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी चोखरित्या पार पाडत समन्वयपूर्वक लसीरकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी गांर्भीर्याने आणि उत्साहाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना दिल्या.

औरंगाबादच्या नामांतरावर अजित पवार बोलले...

पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी युद्धपातळीवर वर्षभर आपण सर्वजण कोरोना विषाणू विरोधात लढा देत आहोत. या लढाईतल्या महत्त्वाच्या वळणावर आपण आलेलो आहोत. आता लसीरकण मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावयाचे आहे. यामध्ये प्रत्येकाचे योगदान आणि भूमिका महत्वाची असून पोलीस विभाग या मोहीमेत सक्रीयपणे सहभागी होईल. तरी सर्वांनी पूर्ण क्षमतेने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी यावेळी केली.

डॉ. वाघ यांनी लसीकरण पूर्वतयारी बाबत माहिती दिली. डॉ. मुजीब यांनी लसीकरण केंद्रावरील घ्यावयाची खबरदारी, संभाव्य समस्या व उपाय याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस आरोग्य, महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, नगर विकास यासह इतर संबंधित इत्यादी विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad news covid 19 vaccination centre should ready sunil chavan