esakal | मुलांच्या भांडणात फुटली किडनी; कमलनयन बजाज रुग्णालयाची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

बोलून बातमी शोधा

kidney surgery}

आपल्या १४ वर्षाच्या मुलाची एक किडनी काढावी लागू शकते, हे ऐकल्यावर पालक चिंताग्रस्त झाले

मुलांच्या भांडणात फुटली किडनी; कमलनयन बजाज रुग्णालयाची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: मुलांचे खेळातील भांडण हे नेहमीचेच असते. भांडणार नाहीत ती मुले कसली? पण हे भांडण जीवावर बेतणारे ठरले तर मग तोंडचे पाणी पळते. अशीच घटना काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यात घडली. भांडणांमध्ये एका मित्राने दुसऱ्याच्या पोटात जोरात गुद्दा लगावला. घरी आल्यावर भांडण झाल्याचे घरच्यांना सांगितले तर ते रागावतील म्हणून पडलो आणि पोटात दुखत आहे, असे या मुलाने सांगितले. त्यामुळे फारसे गांभीर्याने न घेता गावातल्या डॉक्टरांना जरा दुखते आहे असे सांगून औषधे घेतली.

मात्र त्रास कमी न होता उलट वाढतो आहे असे लक्षात आल्यावर औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयात पालक मुलाला घेऊन आले. या मुलाने रुग्णालयात आल्यावर मात्र डॉक्टरांना मात्र नेमके काय झाले होते ते सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचे सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना धक्काच बसला. सिटी स्कॅनमध्ये या मुलाच्या मूत्रमार्गात जन्मतःच अडथळा असून किडनी सुजलेली होती व यावर मुका मार लागल्यामुळे ती फुटली असल्याचे लक्षात आले.

मराठवाड्यात आणखी साडेसहाशे रुग्ण, सर्वाधिक २७५ कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात

अशा परिस्थितीत किडनी काढण्याशिवाय अन्य उपाय नसतो- 
आपल्या १४ वर्षाच्या मुलाची एक किडनी काढावी लागू शकते, हे ऐकल्यावर पालक चिंताग्रस्त झाले. डॉक्टरांसमोरही पेच निर्माण झाला. मात्र बजाज रुग्णालयातील मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. आदित्य येळीकर यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून दुर्बिणीद्वारे फुटलेली किडनी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या पालकांनी देखील डॉक्टरांवर विश्वास ठेऊन परवानगी दिली.

गेल्या आठवड्यात कमलनयन बजाज रुग्णालयात या मुलावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून फक्त किडनीच दुरुस्त केली नाही तर मूत्रमार्गात अडथळाही काढला. ही शस्त्रक्रिया डॉ. आदित्य येळीकर यांनी भूलतज्ज्ञ डॉ. संजीव पुरोहित, बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गोसावी यांच्यासह सिस्टर माया साबळे आणि संजय जाधव यांच्या सहकार्याने यशस्वी केली. या यशाबद्दल कमलनयन बजाज रुग्णालयाचे चेअरमन सी. पी. त्रिपाठी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नताशा वर्मा आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. मिलिंद वैष्णव यांनी  डॉक्टरांचे तसेच कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

थरार! जीवापेक्षा पेट्रोल पडले महागात, पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावरुन गेला ऊसाचा...

अशाप्रकारे किडनीची इजा होणे दुर्मिळ आहे आणि त्यात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून ती दुरुस्त करणे हे तर फारच दुर्मिळ आहे. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि रुग्णालयाने माझ्यावर विश्वास ठेऊन मला ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात मोठे साहाय्य केले. शस्त्रक्रिया झाल्यावर थोडी काळजी होती मात्र आता रुग्ण व्यवस्थित चालत फिरत असून पूर्ववत जीवन जगत आहे याचा खूप मोठा आनंद आहे- डॉ. आदित्य येळीकर