अवघ्या चोवीस वर्षाच्या त्याने काय कारनामे केले एकदा वाचाच..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

अमोल वैजिनाथ गलांडेने त्याच्या एका खास साथीदारासोबत घरफोड्या सुरू केल्या. त्याचा हा खास साथीदार आता कारागृहात आहे. यादरम्यान अमोलला नशाकारक गोळ्या खाण्याची सवय लागली. नशेतही अनेकदा त्याने घरफोड्या केल्या. त्याच्यावर तब्बल सतरा गुन्हे आहेत.

औरंगाबाद - अल्पवयीन असताना वाईट संगत लागली. साथीदाराकडून घरफोडीचे धडे घेतले आणि चोरीला सुरवात केली. ऐन तारुण्यात त्याच्या नावावर एक-दोन नव्हे, तर तब्बल सतरा घरफोड्या झाल्या. या घरफोड्यांसाठी त्याने विशिष्ट आधुनिक हत्यारही तयार केले होते. याद्वारे त्याने घरफोड्या केल्या. या संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी (ता. पाच) बेड्या ठोकल्या. 

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सानेवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल वैजिनाथ गलांडे (वय 24, रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन असताना तो घरफोड्यांत सक्रिय झाला. नंतर त्याने त्याच्या एका खास साथीदारासोबत घरफोड्या सुरू केल्या. त्याचा हा खास साथीदार आता कारागृहात आहे. यादरम्यान अमोलला नशाकारक गोळ्या खाण्याची सवय लागली. नशेतही अनेकदा त्याने घरफोड्या केल्या. त्याच्यावर तब्बल सतरा गुन्हे आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! तो म्हणाला खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलीसमोर केले असे 

रेकॉर्डवरील संशयितांचा शोध घेताना अमोल जामिनावर सुटल्यापासून एकतानगर, जटवाडा रोड येथे राहतो, अशी माहिती पोलिसांना समजली. त्यांनी तेथून त्याला ताब्यात घेत चौकशी केली, तेव्हा त्याने सातारा परिसरात बिअर शॉपी फोडल्याची कबुली दिली. 24 एप्रिल 2019 ला जवाहरनगर भागात त्याने घरफोडी केली होती. या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला होता. त्याला अटक करण्यात आली.

कुलूप तोडण्याची अशी युक्ती 
पोलिसांनी त्याच्याकडून एक हत्यार जप्त केले. त्याने घरांचे कुलूप तोडण्यासाठी आधुनिक हत्यार बनवून घेतले होते. तयार केलेल्या हत्याराचे हूक कुलुपात टाकायचे व जोरदार झटका द्यायचा. यामुळे कुलपातील आट्यांचा आकडा बाहेर येतो किंवा कुलपाचा कोंडा तुटतो. त्यामुळे चोरीसाठी त्याचे काम सोपे होत असे. 

चोरीनंतर बदलायचा खोली 
अमोल हा संतोषीमातानगर, मुकुंदवाडी येथील राहणारा आहे. त्याचे वडील येथेच राहतात; पण तो आता विविध ठिकाणी खोली बदलून राहतो. घरफोड्या केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये व पोलिसांना आपला ठावठिकाणा लागू नये म्हणून तो सतत खोली बदलत होता, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी दिली. 

हेही वाचा -मनस्थिती बायोपोलार अन..लोक काय म्हणतील..याची चिंता तर मग हे नक्कीच वाचा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News - Young man arrested for stealing