ही बघ, तू केलेल्या चोरीची बातमी! 

मनोज साखरे
Tuesday, 28 January 2020

सिकंदरला पकडला जाणार तर नाहीस ना, असे म्हणणारा सराफा व्यापारीच सिकंदरमुळे पोलिसांच्या गळाला लागला. तो असा की, पुंडलिकनगर पोलिसांनी सिकंदरला जालन्यात नेले. तेथे सराफा व्यापारी अनिल शेळके याला फोन करायला लावत अमरावतीत डल्ला मारला, आणखी तीस तोळे सोने असल्याचे सांगायला लावले व अनिल शेळके याला चौफुलीवर बोलावून घेतले.

औरंगाबाद: "ही बघ, तू केलेल्या चोरीची बातमी छापून आली... पकडला जाणार तर नाही ना...' असा मजकूर व बातमीचे कात्रण व्हॉट्‌सऍपद्वारे चक्क 68 गुन्हे दाखल असलेल्या चोराला सराफा व्यापाऱ्यानेच पाठविले.

त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी याच चोराच्या मदतीने सराफा व्यापाऱ्याला सोमवारी (ता. 27) पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चाळीस तोळे सोने पोलिसांनी जप्त केले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, 29 डिसेंबरला सिडको, एन-चार परिसरातील निवृत्त डॉ. नामदेव जी. कलवले (67, रा. एफ-1, बी-सेक्‍टर, एन-चार, सिडको) यांचा बंगला फोडून चोरांनी 77 तोळ्यांचे दागिने व पावणेपाच लाखांची रोकड लांबविली होती.

या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी खिडकी गॅंगचा मुख्य सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (35, रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) याला अटक केली. अटकेनंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने सुरवातीला टाळाटाळ केली व भलत्याच सराफा व्यापाऱ्याला सोने दिल्याचे सांगितले होते;

परंतु त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर तो भावनिक झाला व त्याने जालना येथील माऊली ज्वेलर्सच्या अनिल शेळके याला दिल्याचे खरे सांगितले. यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी जालना येथील सराफा व्यापारी अनिल शेळके याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 40 तोळे सोने हस्तगत केले.

तसेच पोलिसांनी सिकंदरकडून 12 लाख 93 हजारांची रक्कम व कार जप्त केली. टोळीतील तिसरा संशयित फेरोज (रा. घोडेगाव, जि. नगर) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.  ही कारवाई उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, जमादार रमेश सांगळे, दीपक जाधव, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, रवी जाधव, जालिंदर मांटे यांनी केली. 

असा लागला गळाला... 

सिकंदरला पकडला जाणार तर नाहीस ना, असे म्हणणारा सराफा व्यापारीच सिकंदरमुळे पोलिसांच्या गळाला लागला. तो असा की, पुंडलिकनगर पोलिसांनी सिकंदरला जालन्यात नेले. तेथे सराफा व्यापारी अनिल शेळके याला फोन करायला लावत अमरावतीत डल्ला मारला.

आणखी तीस तोळे सोने असल्याचे सांगायला लावले व अनिल शेळके याला चौफुलीवर बोलावून घेतले. शेळके येताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा आपण दागिने घेतल्याची त्याने कबुली दिल्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी सांगितले. त्याच्याकडून सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करून अटकही केली. 

मध्य प्रदेशातही दागिने 
विकले, कार खरेदी 

सिकंदरने चोरीच्या पैशांतून एक कार खरेदी केली होती. पोलिसांनी सिकंदरकडून कार जप्त केली. घरफोडीतील सोने त्याने जालन्यानंतर मध्य प्रदेशातील एका सराफा व्यापाऱ्याला विक्री केले. मध्य प्रदेशातील सराफा व्यापारीही पोलिसांच्या रडारवर आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad NewsYoung Man Arrested For Stealing