शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांना आंदोलनादरम्यान शिवीगाळ; भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

सचिन चोबे
Monday, 15 February 2021

दाखल केलेल्या तक्रारीवरून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांसह एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सिल्लोड (औरंगाबाद): भाजपने शुक्रवार (ता.12) रोजी केलेल्या रास्तारोको आंदोलनात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांची मानहानी केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.13) तक्रार केली होती.

या दाखल केलेल्या तक्रारीवरून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांसह एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषदेने भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या शहरालगत असलेल्या मालकीच्या जागेवरील संरक्षक कुंपन तोडून कारवाई केली होती.

मराठवाड्याला वाढीव निधी किती मिळणार? औरंगाबादमध्ये अजित पवारांसह तेरा...

नगर परिषदेने ही कारवाई राजकीय आकसातून केल्याचा ठपका ठेवून नगर परिषदेच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शुक्रवार (ता.12) रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दिड तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांची मानहानी केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार (ता.13) रोजी संबंधित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता.

भाजपा शिवसेना एकत्र! वर्षाअखेर पालिकेच्या निवडणुका

रात्री उशिरा याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जून गाढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया, अमोल ढाकरे व माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांचे विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुनिल अंधारे करीत आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad political news Minister of State Abdul Sattar insulted during agitation Filed a case against BJP workers