आरटीई प्रवेश : पालकांना कधी येणार एसएमएस वाचा...

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद  : मागील एक महिन्यापासून पालक प्रतिक्षेत असलेल्या आरटीईची सोडत मंगळवारी (ता.१७) सकाळी अकरा वाजता काढण्यात आली. कोरोनामुळे आरटीई २५ टक्के प्रवेशाची लॉटरी प्रक्रिया ही नेहमीप्रमाणे हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, आरटीई समन्वयक श्रीमती सावळे आदी मोजक्याच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, असे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी कळविले आहे. 
जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ५८४ शाळांमधून पाच हजार ४३ जागांसाठी पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तब्बल १६ हजार सहाशे पालकांनी आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.

 आता या पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली होती. मंगळवारी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना १९ मार्चला दुपारनंतर निवडीची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी राज्यस्तरावरुन प्रवेशाची एकच सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे आरटीईची प्रक्रिया लवकर होईल. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरल्यास त्यांची टप्प्या-टप्प्याने प्रतीक्षा यादी लावली जाईल. 

जागा रिक्त होताच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. जागा रिक्त होत असेल तर त्याची सूचना पालकांना एसएमएसच्या माध्यमातून मिळेल. पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून राहू नये, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. 

ॲपवर पाहता येणार माहिती 
पालकांनी आरटीई पोर्टलवर डेटा क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली अथवा नाही ते पाहावे. प्रवेशासाठी पालकांनी रहिवासी पुरावा, जन्माचा पुरावा, प्रवर्गात असल्यास जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अनाथ बालकांसाठी सांभाळ करीत असलेल्याचे हमीपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता पडताळणी समितीकडे करणे गरजेचे आहे. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो. तसेच पहिल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या पाल्यांचा प्रवेश केला नाही तर उरलेल्या जागेचा आढावा घेत वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. 


‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पडताळणी समितीचे कामकाज तसेच पडताळणीनंतर प्रत्यक्ष शाळेत जावून प्रवेश करणे याबाबी ३१ मार्चनंतर म्हणजे शाळा सुरळीत सुरु झाल्यानंतर होईल. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरल्यास त्यांची टप्प्या-टप्प्याने प्रतीक्षा यादी लावली जाणार आहे. जागा रिक्त होताच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. जागा रिक्त होत असेल तर त्याची सूचना पालकांना एसएमएसच्या माध्यमातून दिली जाणार आहे.’’ 
-सूरजप्रसाद जयस्वाल (शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com