इथं धडाधड धडकतात गाड्या : औरंगाबादेतील भयंकर जागा

photo
photo

औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपूल तयार झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाला होता. अपघातांचा हा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. उड्डाणपुलाला दर्गा चौकामध्ये वळण असल्याने वाहनधारकांना अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

संग्रामनगर उड्डाणपूल तयार होऊन साधारण पाच वर्षे झाली आहेत. पूल वाहतुकीला खुला झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी एमआयटी महाविद्यालयाचा विद्यार्थी बीड बायपास रस्त्याने शहराकडे येत असताना पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यूमुखी पडला होता. या अपघातानंतर वाहनधारक स्वत:च काही प्रमाणात काळजी घेत असल्याचे चित्र आहे. 

अपघाताची कायम भीती 

बीड बायपास रस्त्याने उड्डाणपुलावरून शहरात आल्यानंतर दर्गा चौकामध्ये पुलाच्या रस्त्याला डाव्या बाजूने वळण दिलेले आहे. त्यामुळे सुसाट वेगात आलेला वाहनधारक डावीकडे जाण्याऐवजी उजव्या बाजूला घुसतो. त्यामुळेच वाहनधारक पुलाच्या कठड्यावर आदळतो.

वाहन वेगात असेल तर अपघाताची शक्‍यता वाढते. आठवड्यात किमान दोन-तीन छोटे-मोठे अपघात होत असतात. याशिवाय उड्डाणपुलामध्ये दुभाजक नसल्यानेही अपघाताची शक्‍यता कायमच असते. साधारण अर्धा किलोमीटर अंतराचा हा पूल पूर्ण झाल्यापासून काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी दूर झाली मात्र असे असले तरीही तांत्रिकदृष्ट्या अनेक चुका कायम राहिल्याने अपघाताची शक्‍यता कायम असते. दर्गा चौकात कायम अपघातग्रस्त स्थिती असते. 

रॉंगसाईडचा सिलसिला 

उड्डाणपुलाच्या खाली देशपांडेपुरम आणि देवानगरीमध्ये जाणारे नागरिक पुलाला वळसा घालून जाणे अपेक्षित आहे. मात्र, असे न करता वाहनधारक उजव्या बाजूने रॉंगसाईडने जातात. रॉंगसाईड वाहनांमुळे या ठिकाणी नेहमीच छोटे-मोठे अपघात कायमच होत असतात.

त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या खाली दोन्ही बाजूच्या रस्त्यांची रुंदी कमी असून, फुटपाथही नाही. याशिवाय रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे या परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पुलाच्या खाली वाहनधारक पार्किंगसारखा वापर करतात. पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहनांची अनधिकृत पार्किंग तयार झाली आहे. महापालिकेने पुलाच्या खाली असलेल्या जागेचा सुलभ शौचालय किंवा अन्य कामासाठी विधायक वापर करणे आवश्‍यक असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. 

संग्रामनगरला पर्यायी रस्ता हवा 

अभिषेक गौंड : संग्रामनगरला उड्डाणपूल आहे. मात्र, लाखभर लोक राहत असलेल्या सातारा-देवळाई परिसर शहराला जोडणारा हा दुवा असल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक आहे. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार झाला पाहिजे. सद्यःस्थितीत उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर दोन्ही बाजूला खड्डे आहेत. म्हणूनच पूल असूनही या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटत नाही. पुलावर दुभाजक नसल्याने वाहतूक मंदावलेली असते. 

ठेकेदारांचे पोट भरण्यासाठीच 

अमोल दांडगे : शहरातील उड्डाणपूल केवळ ठेकेदारांचे पोट भरण्यासाठीच उभारले आहेत की काय असा प्रश्‍न पडतो. सेव्हन हिल उड्डाणपुलाचा अपवाद वगळता सगळेच पूल चुकीचे आहेत. नाशिक शहराच्या धर्तीवर जालना रोडवरही एकच उड्डाणपूल हवा होता. रेल्वेस्टेशनच्या पुलावरून जाताना आपण कधी पडतो की काय असे वाटते. यापुढे शहरातील उड्डाणपूल उभारताना नियोजन हवे. 

मातीमुळे रस्ताही आखूड 

दादा झारगड : रेल्वेस्टेशनजवळील उड्डाणपुलाची मांडणीच चुकीची आहे. उड्डाणपुलाच्या खाली उतरायचे झाल्यास एकाच बाजूने रस्ता आहे. या ठिकाणी रॉंगसाईडही अधिकृत झाल्यासारखे वाटते. उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे आहेत. रस्त्यावर प्रचंड माती असून कडेला अडीच फुटांपर्यंत माती आहे. हा ढिगारा पाऊण फुटाचा झाला आहे. एखाद्याने ओव्हरटेक केल्यास धूळ उडते. ही माती काढल्यास हा रस्ता वापरात येईल. 

उड्डाणपुलावर अपघात टाळण्यासाठी सक्षम पद्धतीचे गतिरोधक बसवले पाहिजेत. त्याचप्रमाणे पुलाच्या दोन्ही बाजूंनी खाली असलेल्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण केले पाहिजे. पुलाच्या खाली असलेल्या जागेचा महापालिकेने योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. 

- श्रीमंत गोर्डे पाटील (अध्यक्ष, मेट्रो औरंगाबाद असोसिएशन) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com