esakal | एका उंदरामुळे औरंगाबादला ३२ तासानंतर सुरु झाला पाणीपुरवठा! नागरिकांची पाण्यासाठी ओरड
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. बुधवारी (ता. १७) रात्री जायकवाडी येथील १४०० मिलिमीटरच्या योजनेचा वीजपुरवठा खंडीत झाला.

एका उंदरामुळे औरंगाबादला ३२ तासानंतर सुरु झाला पाणीपुरवठा! नागरिकांची पाण्यासाठी ओरड

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पॅनल बोर्डात उंदीर गेल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पर्यायी रोहित्र बसवून गुरूवारी (ता.१८) सायंकाळी पाणी उपसा सुरू केला. पण शहरात प्रत्यक्षात पाणी येण्यासाठी तब्बल ३२ तासांचा अवधी गेला. शुक्रवारी (ता. १९) पहाटे पाणीपुरवठा सुरू झाला.

वाचा - डोळ्यासमोर एकुलत्या एक मुलाने सोडले प्राण, वडिलांनी फोडला हंबरडा


शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. बुधवारी (ता. १७) रात्री जायकवाडी येथील १४०० मिलिमीटरच्या योजनेचा वीजपुरवठा खंडीत झाला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा एमआयडीसीतील ट्रान्सझेल्टा कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्क साधला. त्यांनी अर्ध्या रात्रीच रोहित्राची तपासणी केली, तेव्हा त्यातून ऑईल बाहेर आल्याचे निदर्शनास आले.

वाचा - कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आमदार लग्नात डीजेवर नाचले, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

त्यानंतर काल पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बी. डी. घुले यांनी पर्यायी रोहित्र बसवून दुपारी चार वाजता पाणी पुरवठा सुरू केला. सायंकाळी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन रात्री साडेनऊ वाजता शहरात पाणी आले. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर सिडको-हडकोसह इतर भागांना पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र महापालिकेचे तब्बल ३२ तास वाया गेले. पॅनलमध्ये उंदीर अडकल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

लोकप्रतिनिधींसह नागरिकांची ओरड
पाणीपुरवठ्यात तब्बल २३ तासांचा खंड पडल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना फोन करून त्रस्त केले. आज आमच्या भागाला पाणी येणार की नाही? किती वाजता येईल, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.