
क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. वडिलांनी हंबरडा फोडला.
भोकरदन (जि. जालना) : आकाशात अचानक काळे ढग दाटून आल्याने शेतात सोंगून ठेवलेला मका झाकण्यासाठी शेतकरी पिता- पुत्र धावपळ करीत असताना कडकडाट करीत वीज कोसळली. गंभीर जखमी झालेल्या एकुलत्या मुलाचा वडिलांच्या डोळ्यासमोर जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तडेगाव वाडी (ता. भोकरदन) येथे गुरुवारी (ता.१८) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल रायसिंग सुंदर्डे (वय २५) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वाचा - कोरोना लस घेतलेले दोन डॉक्टर पॉझिटिव्ह, पहिल्या डोसनंतरही धोका कायम
रायसिंग सुंदर्डे यांची तडेगाव वाडी शिवारात शेती आहे. राहुल हा त्यांचा एकुलता मुलगा. त्याला एक लहान मुलगा आहे. तालुक्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, गारपीट झाली. याच दरम्यान राहुल व त्याचे वडील शेतात सोंगून गंजी करून ठेवलेली मका झाकण्यासाठी प्रयत्न करीत होते. वडील एका बाजूने तर मुलगा काही अंतरावर काम करीत असताना विजांचा कडकडाट सुरू झाला.
वाचा - दहावी, बारावी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांना शाळेत जाणे बंधनकारक नाही
राहुलच्या अंगावर वीज कोसळली. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. वडिलांना काही कळायच्या आत हे सर्वकाही घडले, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. वडिलांनी हंबरडा फोडला. त्यामुळे परिसरातील शेतकरी धावले. त्यांनी राहुलला भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संपादन - गणेश पिटेकर