विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्याने रास्तारोको..वाचा कुठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्याने रास्तारोको..वाचा कुठे

विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्याने रास्तारोको..वाचा कुठे

औरंगाबाद : दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. सहा) विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. एबीव्हीपी, आरएसएस विरोधात नारे लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थी रस्त्यावरच बसले आहेत. 

दिल्ली येथील जेएनयूमध्ये रविवारी (ता. पाच) सायंकाळी तोंडाला रुमाल बांधून हल्लेखोरांनी विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या वसतिगृहात घुसून हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ औरंगाबाद विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन पुकारले. त्यानुसार, विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बैठक झाली. त्यानंतर वाय कॉर्नर ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत मानवी साखळी करण्यात आली. यावेळी एबीव्हीपी, गृहमंत्री अमित शहा, आरएसएसच्या विरोधात नारे देण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर पोहोचल्यानंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्यास समोर बसून विद्यार्थी निषेध नोंदवणार होते. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांना आत जाण्यापासून रोखले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. यावर तोडगा म्हणून विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. "स्टॅंड विथ जेएनयू, एबीव्हीपी मुर्दाबाद' अशाप्रकारचे फलक घेऊन निषेध नोंदवला जात आहे.

विद्यापीठासमोर सुरु असलेल्या आंदोलनात विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी भाषण करत आहेत. एसएफआय आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. आंदोलनात एनएसयुआय, एमआयएमची विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पॅंथर रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन, समता विकास आघाडी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, एआयएसएफ, सत्यशोधक विद्यार्थी संघटना यांचा सहभाग आहे. याठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. 

आंदोलनात लोकेश कांबळे, नितीन वाव्हळे, सचिन निकम, कुणाल खरात, अमोल खरात, अमोल दांडगे निलेश आंबेवाडीकर, मोहित जाधव, अतुल कांबळे, गुणरत्न सोनवणे, राजू पठाण, दीपक केदारे, अमोल घुगे, अब्दुल रहमान आलम खान, शहरोज खान, नवाज कुरेशी, सत्यजित मस्के, मेघना मराठे, मोनाली अवसरमल, जयश्री शिर्के, श्रद्धा खरात, समीक्षा मौर्य, दीक्षा पवार, सरोज खंदारे, आदींची उपस्थिती होती.