डाॅक्टर म्हणाले, घाबरू नका! सगळं ओके आहे, पण काही मिनिटांतच....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

  • दुचाकी अपघातात चिमुकलीचा मृत्यू 
  • करमाड-लाडसावंगी मार्गावरील घटना

करमाड (जि. औरंगाबाद) - तलाठी म्हणून रुजू होण्यासाठी स्कुटी मोपेडवर पतीच्या पाठीमागे साडेचार महिन्यांच्या मुलीला घेऊन निघालेल्या महिलेचा पदर चाकात अडकून तिघेही खाली पडले. यात पती-पत्नी किरकोळ जखमी झाले; पण मुलीच्या डोक्‍याला मोठी जखम पोचून तिचा मृत्यू झाला. "एकीकडे हसू, दुसरीकडे आसू' अशी हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सोमवारी (ता. दहा) दुपारी करमाड-लाडसावंगी मार्गावर घडली. 

अद्विका सुधाकर साळुंके (रा. मनेगाव, ता. वैजापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. आई शुभांगी साळुंके-कदम, पती सुधाकर कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत.  करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी साळुंके या भोकरदन तहसील कार्यालयात तलाठी म्हणून रुजू होण्यासाठी सोमवारी करमाड-लाडसावंगीमार्गे पतीसह स्कुटीवर जात होत्या. सोबत चार महिन्यांची मुलगी अद्विका होती. सुधाकर हे स्कुटी पेप (एमएच-20, ईव्ही-9604) चालवत होते. पिंपळखुंटा शिवारातील म्हसोबा मंदिरासमोरून जात असताना अचानक शुभांगी यांच्या साडीचा पदर पाठीमागील चाकात अडकला. त्यामुळे सुधाकर यांचा गाडीवरील ताबा सुटला व तिघेही वाहनासह खाली पडले. अद्विका ही आईच्याच हातावर पडल्याने तिला काहीच लागलेले दिसून आले नाही. घटनेनंतर याच गाडीवरून चार किलोमीटर अंतरावरील लाडसावंगीतील एका खासगी दवाखान्यात जाईपर्यंत अद्विका हसत-खेळत होती. तेथे डॉक्‍टरांनी
मुलीला तपासून उलटी केली नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

मलमपट्टी करून ते पुढील प्रवासास निघाले. काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अद्विका हिने उलटी केली. त्यामुळे पती-पत्नी घाबरले. त्यांनी पुन्हा एकदा अद्विकाच्या डोक्‍यामागील बाजूस बघितले असता, डोक्‍याचा पाठीमागील भाग लुसलुशीत (ढिला) झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तातडीने तिला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरा करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा - बापरे...फक्त खूनच नाही, तर जाळूनही टाकले

 
एकुलते एक अपत्य गमावले 

साळुंके दांपत्याचे अद्विका हे एकमेव अपत्य. शुभांगी यांची तलाठी म्हणून परीक्षेद्वारे निवड झाली. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन त्या रुजू होण्यासाठी जात होत्या. मात्र, या आनंदाच्या प्रसंगात अद्विकाला हिरावून घेतल्याने पदभार घेणे दूरच राहिले. मात्र हे दांपत्य दुःखात लोटले गेले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baby Dies in Bike Accident At Karmad