डोक्यावर ओझे, कडेवर मुलं, पोटात आग अन् पायाची चाळणी 

शेखलाल शेख
Sunday, 29 March 2020

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या कामगार, मजुरांच्या हाताला काम नाही. कंपन्यांमध्येसुद्धा उत्पादन बंद असल्याने त्यांना काम मिळणे अवघड झाले. काहीजण बांधकाम कामगार म्हणून काम करतात; मात्र साईटसुद्धा बंद झाल्या आहेत. जगण्याचा मार्ग अतिशय खडतर झाल्याने या कामगारांनी थेट आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. रविवारी (ता.२९) अनेक कामगार मध्य प्रदेशकडे पायीच निघाले होते.

औरंगाबाद: कोरोनाचे संकट कामगार, कष्टकरी, मजुरांसाठी भयंकर उपासमार तर घेऊन आलेय. डोक्यावर ओझे, कडेवर मुले, पोटात आग अन् पायाची चाळणी करीत हे कामगार पायपीट करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत. लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या वाळूज, शेंद्रा, चितेगाव, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मध्य प्रदेशातील कामगार जवळपास ४०० ते ५०० किलोमीटर पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत.

औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत जवळपास उत्तरप्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील १५ ते २० हजार कामगार, मजूर आहेत. 
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या कामगार, मजुरांच्या हाताला काम नाही. कंपन्यांमध्येसुद्धा उत्पादन बंद असल्याने त्यांना काम मिळणे अवघड झाले. काहीजण बांधकाम कामगार म्हणून काम करतात; मात्र साईटसुद्धा बंद झाल्या आहेत.

हेही वाचा- त्यांनी लिहुन ठेवली मृत्यूची वेळ...

जगण्याचा मार्ग अतिशय खडतर झाल्याने या कामगारांनी थेट आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. रविवारी (ता.२९) अनेक कामगार मध्य प्रदेशकडे पायीच निघाले होते. डोक्यावर जगण्यापुरते सामान तसेच कडेवर लहान मुले घेऊन ही कुटुंबं निघाली आहेत. सोबत खाण्यासाठी तर काहीच नाही. नगरनाक्यावर त्यांना काहीजण मदत करीत अन्नाचे पाकीट देत आहेत; मात्र पुढील रस्ता त्यांच्यासाठी अनेक संकटांचा आहे.

औरंगाबादपासून भोपाळच्या रोडने अंतर हे ५९४ किलोमीटर आहे. इंदूरचे अंतर हे ४०८ किलोमीटर आहे. यामधील अनेक कामगारांना ४०० ते ५०० किलोमीटरचा प्रवास करून आपले गावे गाठावे लागणार आहे. हा प्रवास करताना त्यांची उपासमार होण्याची शक्यता आहे; मात्र रस्त्यात त्यांना अनेक जण अन्नाचे पाकीट देत आहेत.

आमच्या संघटनेतर्फे आम्ही कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. जेथे कामगार असतील तेथे त्यांना किमान तीन महिन्यांपर्यंत अन्नाची सोय केली जात आहे. तरीही जे कामगार राहण्यास तयार नाहीत अशांची तपासणी करून त्यांना वाहनाने त्यांच्या जिल्ह्यात प्रशासनाने सोडून यायला हवे; तसेच आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आमच्या संघटनेतर्फे कामगारांना मदत करत आहोत.

- उद्धव भवलकर (नेते, सीटू) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP Bihar Mp Worker Returns Home Aurangabad News