दिल्ली जिंकण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या टिमचा लागणार कस

प्रकाश बनकर
Monday, 3 February 2020

औरंगाबादेतून शहराध्यक्षपासून ते सर्व पदाधिकारी या निवडणुकीच्या प्रचाराला दिल्लीला गेले आहेत. दिल्लीतील तिमारपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी औरंगाबादच्या भाजप टिमला देण्यात आली आहे.

औरंगाबाद : दिल्ली विधानसभेसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दिल्ली जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुर्ण शक्ती पणाला लावली आहे. पक्षाच्या अध्यक्षांपासून ते सर्व यंत्रणाला कामाला लावण्यात आली आहे. भाजपतर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही केंद्रीय मंत्र्यावर टाकण्यात आली आहे. या मंत्र्यांची संपुर्ण टीम प्रत्येक मतदारसंघात काम करीत आहे.

औरंगाबादेतून शहराध्यक्षपासून ते सर्व पदाधिकारी या निवडणुकीच्या प्रचाराला दिल्लीला गेले आहेत. दिल्लीतील तिमारपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी औरंगाबादच्या भाजप टिमला देण्यात आली आहे. भाजप उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी ही टीम डोअर-टु डोअर जाऊन प्रचार करत आहे. 

दिल्लीतील तिमारपूर विधानसभा मतदारंसघाचे भाजप उमेदवार सुरेंद्र पालसिंह बिट्टू यांना निवडूण आणण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे. दानवे यांच्याबरोबर औरंगाबादेतून शहराध्यक्ष संजय केणेकर, डॉ. भागवत कराड, गटनेते प्रमोद राठोड, कचरु घोडके, राज वानखेडे, शिवाजी दांडगे, दीपक बनकर आणि कुणाल मराठे यांच्यासह जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी प्रचाराला गेले आहेत. एक ते सहा फेब्रुवारी पर्यंत हे सगळे प्रचारात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा :53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)...   

14 उमेदवार रिंगणात

घरोघरी जाऊन भाजपच्या उमेदवाराचा प्रचार तसेच पक्षाचा जाहिरनामा पोहचविण्याचे काम सध्या हे सगळेजण करत आहेत. या मतदासंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपतर्फे उमेदवार असलेले बिट्टू यापुर्वी दोनवेळा आमदार राहिले आहेत. आतापुन्हा त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आपने विजय पानीयन हा तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. 

हेही वाचा त्या आमदारांना बांगड्या पोस्टाने पाठवणार, विद्यार्थी संघटनांचा आक्रोश 

औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांवर विश्‍वास

या निवडणुकीत भाजपला आम आदमी पक्षाचे मोठे आवाहन आहे. या मतदारसंघातही भाजपचा उमेदवार निवडुन आण्यासाठी औरंगाबादची टीम ताकतीने काम करीत आहेत. यापुर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी औरंगबादच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला होता. त्या निवडणुकीत मोठे यश भाजपला मिळाले होते. त्यामूळे पुन्हा औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांवर विश्‍वास दाखवत त्यांच्यावर दिल्लीतील तिमारपूर विधानसभा निवडणुकीची जाबाबदारी सोपविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Aurangabad Team Delhi Election Campaign