भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 January 2020

तीन तलाक कायदा, कलम 370, गोवंश हत्या बंदी कायदा, मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण न देणे, सीएए तसेच एनआरसी अशा कारणामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अल्पसंख्याक समाजामध्ये काम करणे अवघड झाले. 

औरंगाबाद : केंद्र सरकारकडून सातत्याने अल्पसंख्याक विरोधी धोरणे राबविली जात आहेत. शिवाय अल्पसंख्याक कार्यकर्त्यांकडे पक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत मराठवाड्यातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या दीडशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. 

या सर्वांनी रविवारी (ता. पाच) पत्रकार परिषद घेऊन आपण राजीनामे देत असल्याची घोषणा केली. तसेच या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचासुद्धा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्ही पक्षासोबत एकनिष्ठेने काम करत होतो. अल्पसंख्याक समाजात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला; मात्र पक्षाकडून वारंवार अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात धोरणे राबविली जात आहेत. 

काम करणे अवघड झाले

तीन तलाक कायदा, कलम 370, गोवंश हत्या बंदी कायदा, मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण न देणे, सीएए तसेच एनआरसी अशा कारणामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अल्पसंख्याक समाजामध्ये काम करणे अवघड झाले. 

त्यामुळे राजीनामे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांच्याकडे पाठविले आहेत. सध्या मराठवाड्यातील दीडशे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असून, पुढील आठवड्यात राज्यभरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील, असा दावा यावेळी करण्यात आला. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

यावेळी फारुख पठाम, वाजेद शेख, अब्दुल खालीद, अशफाक पठाण, युसूफ खान, समीर कुरैशी, लतिफ पटेल, बादशाह पटेल, नाहीद खान यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Minority Cell Members Resigned in Aurangabad Breaking News