रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णांची मोठ्या प्रमाणात होतेय लूट

शेखलाल शेख
Tuesday, 29 September 2020

औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पार पडली.

औरंगाबाद : कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरू असून, वेगवेगळ्या किमतीत हे इंजेक्शन विकले जात आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. रुग्णांची फरफट थांबावी आणि इंजेक्शन योग्य किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी ही इंजेक्शन अन्न-औषध प्रशासनाच्या देखरेखी खाली एकाच ठिकाणी ठेवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केल्या.

 

कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, अंबादास दानवे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय ,पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, पोलिस उपायुक्त मीना मकवाना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजीव काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, घाटी रुग्णालयाचे डॉ. झिने उपस्थित होते.

 

दोघा भावांनी तयार केले पाणीपुरीचे एटीएम! स्वच्छता, मानवी हस्तक्षेप...

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रुग्णांसाठी आवश्यक प्रमाणात रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध ठेवण्याची कटाक्षाने खबरदारी घेतल्या जात आहे. घाटी, जिल्हा रुग्णालयासाठी मोठ्या संख्येने हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी खरेदी आदेश दिले आहेत. सध्या १५ टन अधिकचा आॅक्सिजन राखीव ठेवण्यासाठीची व्यवस्था जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून, सध्या ८८.८७ टक्के दराने रुग्ण बरे होत आहेत. त्याचप्रमाणे मृत्युदर २.६९ टक्क्यांवर आला आहे.

खासदार कराड यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन पूरक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यावर विशेष लक्ष देण्याचे सांगून आयसीयू डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे सूचित केले. खासदार जलील यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन योग्य त्या दराने रुग्णांना उपलब्ध होत आहे का, यावर नियंत्रण ठेवत त्याची कुठल्याही प्रकारे चढत्या भावाने विक्री होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष द्यावे. आमदार सावे यांनी अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिव्हिर व इतर औषधांच्या वितरण व्यवस्था नियंत्रणासाठी खबरदारी घेऊन ज्या रुग्णालयाला गरज आहे, तिथे प्राधान्याने इंजेक्शन्स उपलब्ध करून द्यावी. अत्यावश्यक वेळेसाठी इंजेक्शनचा राखीव साठा ठेवावा, असे सूचित केले. आमदार दानवे यांनी रुग्णांना गरजेच्या वेळी इंजेक्शन सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने औषध उपलब्धता ठेवण्याबाबत सूचित केले.

बनावट धनादेशाद्वारे बॅंकेला तब्बल ३६ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Marketing Of Remdesivir Injection Aurangabad News