सामान्य रुग्णांपेक्षा कोविडमध्ये रक्त घट्ट होण्याचे प्रमाण दुप्पट, लवकर उपचार न घेतल्यास बेतू शकते जीवावर

मनोज साखरे
Sunday, 6 December 2020

कोरोनाची बाधा झाली, उपचारही घेतले. आठ-दहा दिवस सर्व काही सुरळीत सुरू असल्यानंतर अचानक श्‍वसनाला त्रास होणे, गरगरणे अथवा कोसळून पडणे असे त्रास कोरोनामुक्त रुग्णांना होत आहेत.

औरंगाबाद : कोरोनाची बाधा झाली, उपचारही घेतले. आठ-दहा दिवस सर्व काही सुरळीत सुरू असल्यानंतर अचानक श्‍वसनाला त्रास होणे, गरगरणे अथवा कोसळून पडणे असे त्रास कोरोनामुक्त रुग्णांना होत आहेत. जास्त संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हे प्रकार आढळून आले असून कोविड रुग्णांत सामान्य रुग्णांपेक्षा रक्त घट्ट होण्याचे व पर्यायाने रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे, अशी माहिती एमजीएमच्या डॉक्टरांनी दिली.
डॉक्टरांनी सांगितले की, नसांमध्ये रक्ताच्या गाठी होणे हा नवखा प्रकार नाही. ही प्रक्रीया आधीही व्हायची. परंतू कोवीड संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये रक्त घट्ट होण्याचे प्रमाण दुपटीने वाढत आहे. ज्या रुग्णांना व्हेंटीलेटर लावण्यात आले.

जे रुग्ण आयसीयूत बराच काळ राहीले, अशा रुग्णाचे रक्त घट्ट होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे अशा रुग्णांच्या हृदयाच्या, फुफुसातील अथवा पायातील नसात गुठळ्या होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांना काळजी घेण्याची जास्त महत्वाचे आहे. तितकेच लवकर उपचार मिळाले तर रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. उपचारास अथवा फुफुसात गुठळ्या झाल्याचे निदान होण्यासच विलंब झाल्यास रुग्णाच्या शरीरात गुंतागुंतीची शक्यता बळावते व ते जीवावरही बेतू शकते. सामान्यतः कोवीडमुळे अथवा न्यूमोनियामुळे दम लागतो, असे बऱ्याचवेळा मानले जाते. ही कारणे लक्षात घेऊन रुग्णांना त्यावेळी गृहीत धरले जाते; पण फुफुसात गाठी झाल्याचे निष्पन्न झाल्यास रुग्ण वाचू शकतो. अशा रुग्णांना रक्तपातळ होण्याची इंजेक्शन्स द्यावी लागतात अथवा रक्तगाठ काढावी लागते. पण हे निष्पन्न होण्यासाठी ‘सीटीस्कॅन ॲन्जियोग्राफी’ करावी लागते. त्यातून गाठी कुठे तयार झाल्या हे स्पष्ट होते त्या गाठी ‘पेनुब्रा डिव्हाईस’द्वारे काढल्या जातात असेही डॉक्टर म्हणाले.

यांना धोका जास्त
कोवीड रुग्णांवर उपचार करणारे योद्धा डॉक्टर्स या रुग्णांच्या संपर्कात जास्त व सातत्याने असतात. त्यांचा व्हायरल लोडही जास्त असतो. शरीरातील व्हायरसची जास्त संख्येमुळे अशा डॉक्टरांना कोरोनाचे उपचार घेतेवेळी अथवा बरे झाल्यानंतरही असा त्रास जाणवू शकतो, असे ‘एमजीएम’मधील हृदयरोगतज्ञ डॉ. प्रशांत उदगिरे यांनी सांगितले. त्यांनी अशीच डॉक्टरांची एक केस यशस्वी हाताळली आहे.

हे करा
- उपचारानंतर बरे झालेल्या कोरोना रुग्णांनी नियमित फॉलोअप घ्यावा.
- काही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांना बोलावे.
- डॉक्टरांनी दिलेल्या रक्त पातळ करण्याच्या औषधी नियमित घ्याव्या.
- कोरोनातून बरे झाल्यानंतर घरीच बसून राहू नका.
- कृती करा. फिरणे, चालणे, इतर शारीरीक हालचाली सुरु ठेवाव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood Become Non Thin Normal Other Covid Patient