जाळून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, पतीस अटक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

कन्नड तालुक्यात चिंचोली लिंबाजी येथे जाळून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिशोर (जि.औरंगाबाद) : चिंचोली लिंबाजी (ता.कन्नड) येथील विवाहित महिलेने पती, सासू व सासऱ्याशी झालेल्या वादातून जाळून घेतले होते. उपचारादरम्यान या महिलेचा बुधवारी (ता.सात) पहाटे मृत्यू झाला. पिशोर येथील पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली.

या विषयी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी सांगितले, की चिंचोली लिंबाजी येथील महिला सरिता उर्फ शोभा जगदीश बिलंगे (वय ३४) हिला तिचे पती, सासू-सासरे हे चांगला स्वयंपाक येत नाही. तीन मुली झाल्या, मुलगा होत नाही या कारणावरून वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. सोमवारी (ता.पाच) सायंकाळी सातच्या सुमारास पती व सासू-सासऱ्यांनी तिच्याशी वाद घातला.

जायकवाडी धरणातून विसर्ग बंद, गोदावरी पात्रात एकतीस दिवस सोडले पाणी

त्रास असाहाय्य झाल्याने सरिताने रॉकेल व डिझेल यांचे मिश्रण स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन आगपेटीने स्वतःला पेटवून घेतले. यात ती गंभीररित्या भाजली होती.नातेवाईकांनी तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी (ता.सात) पहाटे तिचा मृत्यू झाला. पती, सासू व सासरा यांनी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार विवाहितेच्या आईने पिशोर येथील पोलीस ठाण्यात दाखल केली. दाखल फिर्यादीवरून पती, सासू व सासरा यांच्याविरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या पतीस ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. आहेर करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burned Woman Died During Treatment Aurangabad News