जायकवाडी धरणातून विसर्ग बंद, गोदावरी पात्रात एकतीस दिवस सोडले पाणी

चंद्रकांत तारु
Thursday, 8 October 2020

पैठण येथील जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात गेल्या ३१ दिवसांपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण येथील जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात गेल्या ३१ दिवसांपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या काळात १०२ टीएमसी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातून ६० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

रोज खाओ अंडे, पण मिळणार कुठे? औरंगाबाद शहरात अंड्यांचा तुटवडा

ता. पाच सप्टेंबर २०२० पासून जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढल्यामुळे धरण प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. यंदा धरणाच्या स्थानिक मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे या पावसाच्या पाण्यावरच धरण सत्तर टक्के भरले. यानंतर नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टी झाल्याने जायकवाडी धरणावरील सर्व धरणे तुडुंब भरून वाहिली. या एकूण २६ धरणांचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले.

‘समांतर’ची फाईल बंद, एकोणतीस कोटीत लवादमधूनही कंपनीने घेतली माघार

त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढून धरण शंभर टक्के भरल्यामुळे जायकवाडी धरण प्रशासनाने पहिल्या टप्प्यात धरणाचे सोळा दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू केला. यानंतर पावसाचे प्रमाण वाढत राहिल्यामुळे धरणाने धोक्याची पाणीपातळी ओलांडली असता जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे यांनी दरवाजाच्या संख्येत वाढ करून पाणी सोडले.

शेवटी पाऊस थांबण्याचे नाव घेईना. त्यामुळे धरणाचे ता. २० सप्टेंबर २०२० रोजी सर्व २७ वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहिले. यानंतर पुन्हा पाण्याचा अंदाज घेऊन दरवाजांची संख्या कमी करण्यात आली; परंतु नंतर पुन्हा झालेल्या पावसामुळे धरणात पाणी येण्याची आवक वाढल्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा २७ दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, आता पाणीपातळी स्थिर असून आवक कमी झाल्यामुळे धरणातून पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, कुलगुरु येवले यांचे आवाहन

वित्त व जीवित हानी नाही
दरम्यान, जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्यापूर्वी पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने खबरदारी घेतली व गोदाकाठच्या गावांना उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सतर्कतेचा इशारा दिला. त्यामुळे पाणी सोडल्याच्या काळात वित्त व जीवित हानी झाली नाही. नागरिकांनीही सावधानता बाळगली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi Dam's Water Discharge Closed Aurangabad News