ताई, समारंभासाठी मर्यादेपेक्षा निम्म्या व्यक्तींना परवानगी द्या, केटरिंग व्यावसायिकांची सुप्रिया सुळेंना भावनिक साद

प्रकाश बनकर
Friday, 6 November 2020

कोरोना महामारीमुळे असंख्य लहान मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात इव्हेंट अर्थात समारंभ या क्षेत्राशी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचा समावेश आहे.

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे असंख्य लहान मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात इव्हेंट अर्थात समारंभ या क्षेत्राशी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचा समावेश आहे. या क्षेत्राला हवी तशी सूट अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे औरंगाबाद केटरिंग संघटनेने खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत ताई, समारंभासाठी मर्यादेपेक्षा निम्म्या व्यक्तींना परवानगी द्या, अशी मागणी गुरुवारी (ता. पाच) मुंबईत भेट घेऊन केली.

यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे हेमंत गाढवे, महेश लाहोटी, मंगेश निरंतर, गणेश कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, श्रीकांत उपाध्याय, उमेश जोशी, अनिल कुलकर्णी आणि प्रशांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की, लग्नकार्य अथवा अन्य समारंभासाठी हॉल, मंगल कार्यालय अथवा लॉनच्या एकूण क्षमतेच्या निम्म्या व्यक्तीसह परवानगी देण्यात यावी. त्याशिवाय या क्षेत्रातील सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्यांसाठी सोमवारी (ता.दोन) राज्यात ठिकठिकाणी आंदोलन लाक्षणिक आंदोलन केले होते.

सरकारची मान्यता, पण चित्रपटगृहे बंदच; डिजिटल प्रेक्षपणात अडचणी

त्या आंदोलकांवर त्या-त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. त्याशिवाय आमच्या सर्वांतर्फे हा विषय शासनाकडे मांडावा. या प्रमुख मागण्या पत्रकाद्वारे करण्यात आल्या. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खासदार सुळे यांनी संबधित विभागाशी बोलून त्यावर लवकरात-लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी औरंगाबाद केटरिंग संघटनेने औरंगाबादकरांतर्फे सुप्रियाताईंना फराळाची भेट दिली. या फराळाचा त्यांनी स्वीकार करून आभार मानले.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Catering Business Men Appeal To Supriya Sule For Unlock Of Catering