चिकनची चव झाली महाग 

शेखलाल शेख
Monday, 21 September 2020

लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटातून अनेक जण सावरलेले नसल्याने त्यांनी पोल्ट्री अजूनही बंद ठेवल्या आहे. 

औरंगाबादः कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन मध्ये पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. आता चिकने दर १८० ते २०० रुपये किलो पर्यंत गेल्याने पोल्ट्री चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या चांगल्या प्रतीचे चिकन २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच लॉकडाऊनमधील आर्थिक संकटातून अनेक जण अद्यापही सावरलेले नाही. जे कर्जबाजारी झाले त्यांनी पोल्ट्री बंद ठेवल्या आहे. 

कोरोना आणि लॉकडाऊन अगोदर चिकनच्या किंमती १२० ते १४० रुपये प्रती किलोच्या दरम्यान राहत होत्या. कोरोना आल्यानंतर अफवा पसरल्याने पोल्ट्री चालकांकडील कोंबड्या विक्री करणे अतिशय अवघड झाले होते. कित्येकांना तर त्या मातीमोल दराने विक्री कराव्या लागल्या काही पोल्ट्री चालकांनी तर त्या फुकटात वाटल्या. लॉकडाऊन मध्ये तर पोल्ट्री व्यवसाय जवळपास बंद झाल्यात जमा होता.

रुग्ण ही वाढताहेत मृत्युचे सत्र ही सुरुच

लॉकडाऊनमध्ये उत्पादनच घेता आले नाही. लॉकडाऊन शिथिल होतातच काही पोल्ट्री चालकांनी हिंमत करत पोल्ट्री पुन्हा सुरु केली. उत्पादन अतिशय कमी मागणी जास्त असल्याने मे महिन्यात चिकनला २०० रुपये असा दर मिळाला होता. त्यानंतर दर पुन्हा कमी झाले. आता अनेक हॉटेल, धाबे सुरु झाले असून ते पार्सल सुविधा देत आहे त्यामुळे चिकनची मागणी वाढली आहे.

सध्या ग्राहकांना २०० रुपये किलो दराने चिकन घ्यावे लागत आहे. काही ठिकाणी याचा दर १८० रुपये किलो सुद्धा आहे. यामध्ये कोंबड्या लहान, मोठ्या असल्याने दरात तफावत आहे. सध्या चिकन विक्रेत्यांनाच १०० ते ११० रुपये प्रती किलोने जिवंत कोंबडी घ्यावी लागत असल्याने त्यांना २०० रुपये किलोने चिकन विक्री करावे लागत आहे. 

औरंगाबाद शहरात अहमदनगर, नाशिक, मनमाड, येवला तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून कोंबड्या आणल्या जातात. होलसेल व्यापारी चिकनच्या दुकानापर्यंत कोंबड्या पोहचवितात. मात्र आता अनलॉकमध्ये चिकनची मागणी वाढल्याने दर सुद्धा वाढले आहे. पुढील काही महिने सर्व पोल्ट्री सुरु झाल्या शिवाय दर कमी होण्याची शक्यता कमी आहे असे विक्रेते सांगत आहे. 
 

आम्हाला जागेवरच १०० ते ११० रुपयांना जिवंत कोंबडी मिळत आहे. तसेच गावरान चिकन ४०० तर डुप्लीकेट गावरान ३०० रुपये किलो आहे. आता हॉटेल चालक सुद्धा चिकन घेऊन जात आहे त्यामुळे सध्या मागणी खुप चांगली आहे मात्र बाजारात आम्हाला मालच मिळत नाही.
- बाबु भाई (चिकन विक्रेते)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken Rate in Aurangabad News