औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर दिली देशी दारू विक्रीस परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लॉकडाउनच्या काळात बंद केलेली देशी दारू विक्री राज्यभरात सुरू करण्यात आली; मात्र औरंगाबाद महापालिका हद्दीत सुरू न केल्याने वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही प्रतिसाद न दिल्याने देशी दारू विक्रेता संघाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

औरंगाबाद: लॉकडाउनच्या काळात बंद केलेली देशी दारू विक्री राज्यभरात सुरू करण्यात आली; मात्र औरंगाबाद महापालिका हद्दीत सुरू न केल्याने वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही प्रतिसाद न दिल्याने देशी दारू विक्रेता संघाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

मागील सुनावणीदरम्यान खंडपीठाने याचिकेच्या अनुषंगाने १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार १ ऑगस्टपासून अटी-शर्तींसह देशी दारू विक्री करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. याविषयीच्या सविस्तर सूचनाही त्यांनी जारी केल्या आहेत. 

हेही वाचा- दोघेजण घरात घुसले, विवाहितेला बेशुद्ध करुन बांधून ठेवले अन घर नेले धुवून

महापालिका हद्दीत परवानगी देण्यात न आल्याने सुनील जैस्वाल व १३ याचिकाकर्त्यांनी ॲड. रूपेश जैस्वाल यांच्यातर्फे खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. यामध्ये काही अटी घालण्यात आल्या आहेत. 

काय आहेत अटी? 
देशी दारू केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केवळ सीलबंद दारू विक्री करता येणार आहे. दारू खरेदीसाठी पाचहून अधिक ग्राहक आल्यास दोन ग्राहकांतील अंतर सहा फूट ठेवावे लागणार आहे. त्यासाठी दुकानासमोर वर्तुळ आखावे लागणार आहेत. नोकर, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी लागणार आहे.

हेही वाचा- अल्पवयीन मुलीला पळवून नेले, गर्भवती केल्यानंतर न्यायालयात म्हणाला...

तसेच सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांना दुकानात प्रवेश देता येणार नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे. याशिवाय दर दोन तासांनी दुकान व भोवतालचा परिसर निर्जंतुकीकरण करावा लागणार असून दुकानात दारू पिण्यास परवानगी नसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कंटेनमेंट झोनमधील दारू विक्री ही बंदच राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Gave Permission for Alcohol Selling Aurangabgad News