नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्‍ह्यात लागणार १९२ कोटी, चार लाख हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका

माधव इतबारे
Saturday, 24 October 2020

परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सुमार चार लाख हेक्टरवरील पिकांना बसला आहे. पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्याचा अहवाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासनाकडे पाठविला आहे.

औरंगाबाद : परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सुमार चार लाख हेक्टरवरील पिकांना बसला आहे. पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्याचा अहवाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासनाकडे पाठविला आहे. सुमारे १९२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागले, असे अहवालात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बोगस बियाणांच्या तक्रारीनंतर आता शेतातच तयार होणार सोयाबीनचे सरळ बियाणे!

खरिपाचे पिके काढणीला आलेली असताना गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाचा जोर कायम आहे. लहान-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा निचरा शेतातून झालेल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार ७० टक्के खरिपाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुमारे सहा लाख ७० हजार हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. सात जून ते २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या तुलनेत जास्तीची हजेरी लावली. ५५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्याची आकडेवारी तर २०० टक्क्यांपर्यंत आहे. त्याखालोखाल पैठण आणि वैजापूर तालुक्यात पाऊस झाला आहे.

दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस

गतवर्षी २२ ऑक्टोबरपर्यंत यंदाच्या सरासरी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. सरत्या दशकात यंदा सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात झाला आहे. औरंगाबाद तालुका १९४ टक्के, फुलंब्री १३० टक्के, पैठण १८० टक्के, सिल्लोड १६० टक्के, सोयगांव १४२ टक्के, कन्नड १३५ टक्के, वैजापूर १८६ टक्के, गंगापूर १६७ टक्के, खुलताबादमध्ये १२२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ६६० मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता पण आजवर १०५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी २२ ऑक्टोबरपर्यंत १०४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Compensation Aurangabad District Need 192 Crore Rupees