बोगस बियाणांच्या तक्रारीनंतर आता शेतातच तयार होणार सोयाबीनचे सरळ बियाणे!

मधुकर कांबळे
Friday, 23 October 2020

खर्च कमी करण्यासाठी अन् फसवणूक टाळण्यासाठी उपाय

औरंगाबाद : बियाणे उगवलेच नाहीत, कंपनीकडून फसवणूक झाली अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात. यामुळे बियाणांवरच्या खर्चाच शेतकऱ्यांना भूर्दंड सोसावा लागतो. यासाठी बियाणांवरचा खर्च कमी करण्यासाठी यंदाचं बियाणं पुढच्या वर्षासाठी राखून ठेवा, या धोरणानुसार शेतकऱ्यांना शेतातच बियाणे धरण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी बियाणे दिले आहेत. यातून जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे २ हजार ३९० क्विंटल सरळ बियाणे उपलब्ध होणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पूर्वी शेतकरी बियाणे विकत घेण्यापेक्षा पुढच्या हंगामासाठी लागणारे बियाणे चालू हंगामातच शेतात धरले जायचे. मात्र नंतर उत्पादन वाढीच्या अपेक्षेने कंपन्यांची बियाणे वापरायला सुरुवात केल्याने शेतकरी बियाणांसाठी परावलंबी झाले. मग त्यातून कंपन्यांचे विकत घेतलेले बियाणांच्या तक्रारी सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर बियाणावरील खर्च कमी व्हावा यासाठी येथील कृषी विभागाने सोयाबीनचे बियाणे घरीच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी सांगितले की, बियाणावर करण्यात येणारा खर्च कमी व्हावा यासाठी शेतातच बीजोत्पादन करण्याला कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ८ हजार ९६० किलो बियाणे जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले MAUS १५८ वाणाचे ३ हजार ७५० किलो आणि MAUS १६२ वाणाचे ५ हजार २१० किलो बियाणे आहे. १६२ वाण हे हार्वेस्टिंगसाठी खूप चांगले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काढणीच्यावेळी शेंगा तडकून खाली पडून होणारे नुकसान या वाणात कमी होते कारण या वाणाच्या शेंगा जमीनीपासून काही अंतरावर लागतात. हे सरळ वाण आहेत. हायब्रीड वाणात मिक्सिंग असते. हायब्रीड वाण एकाच हंगामात उत्पन्न देते. तर सरळ वाणाचे बियाणे तीन हंगामात उत्पन्न देते म्हणजेच तीन हंगामात सोयाबिन बियाणाचा खर्च वाचणार आहे. यामुळे पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना दिलेल्या बियाणाचे पुढच्या हंगामासाठी बियाणे धरण्याचे आणि पुढील तीन वर्ष लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सरळ वाणाचे उरलेले बियाणे इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी राहणार असल्याचे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Straight soybean seeds ready in field Aurangabad news